मुंबई : आपल्या देशात अल्पमतातील सरकारे चालवली जातात, पण विरोधी पक्षनेतेपदासाठी मात्र अडवणूक केली जाते हे लोकशाहीच्या मूळ तत्त्वांनाच आव्हान देणारे आहे, अशी संतप्त भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
सरकार स्थापनेनंतर दोन अधिवेशनांतरही विरोधी पक्षनेतेपद रिक्तच ठेवण्यात आले आहे. या विषयावर महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षांकडे पाठपुरावा करण्यात आला, विधानसभेत आवाज उठवण्यात आला, सत्कारासाठी विधानभवनात आलेल्या सरन्यायाधीशांनाही निवेदन देण्यात आले. यावर उद्धव ठाकरे यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. मस्तवालपणे वागणाऱ्या लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधीपक्ष नेता हवा असतो. त्यामुळे केवळ संख्याबळाचा आधार घेऊन हे पद अडवणे, हे लोकशाहीस धरून नाही, असे ते म्हणाले. इंद्रकुमार गुजराल यांच्या पक्षाचे संख्याबळ कमी असताना देखील ते पंतप्रधान झाले होते. चंद्रशेखर, देवेगौडा अशी अनेक उदाहरणे आहेत. अल्पमताच्या पक्षाचा माणूस पंतप्रधान होऊ शकतो. पण पुरेसे संख्याबळ नसल्याचे कारण सांगून विरोधपक्ष नेते पद कसे का अडवू शकता? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यावर भाष्य करताना हा सर्व प्रकारच संतापजनक असल्याचे ते म्हणाले. मीरा भाईंदरची मराठी माणसांच्या मनात अनेक वर्षांपासून राग खदखदतोय, सकाळी लोकलमधून येताना आम्हाला विचित्र प्रकारची दादागिरी सहन करावी लागते, असे काही लोक मला सांगतात. असंतोषाचा स्फोट झाला, तर त्याला सरकार जबाबदार असेल. केवळ आयुक्तांच्या माथ्यावर खापर फोडून चालणार नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची देखील ती जबाबदारी आहे.
सर्व राज्याची काळजी घ्यायला पाहिजे. कोणतीही भाषिक दादागिरी आमच्यावर होता कामा नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठीचा मुद्दा आता गरम झालेलाच आहे. केवळ हिंदी सक्तीच्या आदेशाला विरोध करून चालणार नाही. तो जीआर काढणाऱ्यांचा, हिंदी सक्ती लादणाऱ्यांचा आपण विरोध केला पाहिजे. मराठी माणूस आता एकवटलेला आहेत. आमचे पुन: पुन्हा तेच सांगणे आहे की, आमचा कोणत्या भाषेला विरोध नाही, पण सक्तीला विरोध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांच्या प्रश्नावरही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले. फडणवीसांनी शिक्षकांच्या आंदोलनावर भाष्य करताना यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले. पण आता तुम्ही आहात, तर तुम्ही न्याय का देत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. नशीब शिक्षकांच्या प्रश्नाला नेहरू जबाबदार आहेत, असे ते म्हणाले नाहीत. नेहरूंमुळे शिक्षकांना विनाअनुदानित रहावे लागले, असे देखील बोलायला ते कमी करणार नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.
गिरणी कामगारांना धारावीत घरे द्या
गिरणी कामगारांनी आझाद मैदान येथे काढलेल्या मोर्चाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी गिरणी कामगारांना धारावीत घरे द्या अशी मागणी त्यांनी केली. धारावीची जागा अदानचीच्या घशात घातली जात आहे. ज्यांनी मुंबई उभी केली त्यांना मुंबईबाहेर जागा देणार आहात का, असा सवाल करीत गिरणी कामगारांना धारावीमध्येच जागा देण्याची मागणी त्यांनी केली.
धारावीत गिरणी कामगार, पोलीस कर्मचारी, सफाई मजूर या सर्वांना मुंबईत हक्काची जागा देण्याची मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्दैवाने आपले सरकार आले नाही, मात्र आपले सरकार आले तर धारावीमध्ये हक्काची जागा तुम्हाला मिळालीच असती, असेदेखील ते म्हणाले.