मुंबई : हत्येप्रकरणी कोल्हापूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि अभिवचन रजेवर(फर्लोवर) बाहेर पडलेल्या कैद्याने पलायन केले. याप्रकरणी कारागृह प्रशासनाकडून धारावी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर कारागृहातील शिपाई सुहास शेळके(३३) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केल आहे. कैदी रवी नरसाप्पा म्हेत्रे हा धारावी येथील बाबासाहेबनगर पी.एम.जी.पी. कॉलनीतील रहिवासी आहे. आरोपीविरोधात सांगली येथील संजयनगर पोलीस ठाण्यात २००९ मध्ये हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणी जलदगती न्यायालयाने आरोपीला हत्येची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याला कोल्हापूर येथील कारागृहात ठेवण्यात आले. त्यादरम्यान करोनामुळे अनेक कैद्यांना संचित व अभिवचन रजेवर सोडण्यात आले. त्याला ९ जून २०२१ ला अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. ४५ दिवसांच्या या रजेनंतर ३०-३० दिवसांच्या टप्प्याने रजा वाढ देण्यात आली.  शेवटचा रजा वाढ कालावधी हा दिनांक २० मे २०२२ रोजी संपुष्टात आला. त्यात जास्तीत जास्त १५ दिवस वाढ घेऊन ४ जूनला उपस्थित राहणे अपेक्षित होते. पण म्हेत्रे कारागृहात हजर झाले नाही.