मुंबई : धावत्या लोकलमधून पडून रेल्वे प्रवाशांचा मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्वसामान्य नोकरदारांचा अशाप्रकारे अपघात होणे चुकीचे आहे. त्यामुळे नवीन वर्षापासून स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल धावेल. मुंबईतील सध्या धावत असलेल्या लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येतील. तर, येत्या काळात २३८ नवीन रेक दाखल होणार असून, त्यामुळे ६० टक्के प्रवासी क्षमता वाढेल, असा विश्वास रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.
घणसोली येथील अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्याच्या कार्यस्थळाला आश्विनी वैष्णव यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी वैष्णव म्हणाले की, देशभरातून नागरिक मुंबईत नोकरीनिमित्त येतात. मुंबईच्या अर्थव्यवस्थेत आपले आर्थिक योगदान देतात. परंतु, दरवर्षी अनेक प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू होतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येतील. वातानुकूलित लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत. आता नवीन तयार होणाऱ्या सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येतील. स्वयंचलित दरवाजांमुळे लोकलमधून पडून होणारे अपघात पूर्णपणे बंद होतील. वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणे नव्या लोकलमध्ये प्राणवायूचे प्रमाण अधिक असेल, असे वैष्णव म्हणाले.
मुंब्रा येथे जून २०२५ मध्ये लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) सोबत बैठक घेतली. त्यानंतर, सामान्य लोकलच्या रचनेत बदल करून हवा खेळती राहील अशा पद्धतीची रचना करून डबा तयार करण्याचा, स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल चालविण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला. त्यानंतर, ऑगस्ट २०२५ मध्ये मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजा असलेला नमुना डबा विकसित केला होता.
सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बंद केल्यास, वायुवीजन कमी होऊन प्रवासी गुदरमतील. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन यावर उपाय शोधण्यात आला. स्वयंचलित दरवाजांना लूव्हर्स (हवेशीर पट्ट्या) असतील. त्यामुळे या लूव्हर्समधून हवा खेळती राहील. डब्यामध्ये ताजी हवा यावी यासाठी लोकलच्या छतावर वेंटिलेशन युनिट बसविण्यात येणार आहेत.
या नवीन रचनेची पहिली लोकल नोव्हेंबर २०२५ पर्यंत तयार होईल. तर, आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्रानंतर ती जानेवारी २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल केली जाईल. तसेच, मुंबई उपनगरी रेल्वे सेवांसाठी तयार करण्यात येणाऱ्या २३८ वातानुकूलित लोकलव्यतिरिक्त या लोकल असणार आहेत.
लांबपल्ल्याच्या रेल्वे गाडीप्रमाणे सुविधा
लांबपल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या पहिल्या डब्यामध्ये चढल्यानंतर शेवटच्या डब्यापर्यंत जाता येईल. तसेच, सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविल्यानंतर, सामान्य लोकलचे डबे एकमेकांना जोडले जातील. त्यामुळे लोकलच्या एका डब्यामध्ये चढल्यास, दुसऱ्या डब्यामध्ये जाणे शक्य होईल. यामुळे गर्दी विभाजित करणे शक्य होईल. सध्या वातानुकूलित लोकलचे डबे एकमेकांना जोडलेले आहेत.