मुंबई : ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२५’ साठीची अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अंतिम निवड झालेल्या दुर्गांची नावे आणि त्यांच्या समाजातील प्रेरणादायी योगदानाची माहिती नवरात्रोत्सवात वाचकांना करून दिली जाणार आहे. सोमवारी घटस्थापनेपासून दररोज एक याप्रमाणे नऊ दिवस ही माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

स्त्रीमुक्ती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या शारदा साठे, ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शिका सुषमा देशपांडे आणि ज्येष्ठ रंगकर्मी मीना नाईक यांनी परीक्षक म्हणून यंदाच्या नऊ ‘लोकसत्ता दुर्गां’ची निवड केली. प्रतिकूलतेवर मात करून अतुलनीय कार्य करून स्वत:च्या कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजावर उमटवणाऱ्या, संशोधन करून नवनवे शोध लावणाऱ्या, आणि विविध क्षेत्रांत समाजिक कार्य करणाऱ्या स्त्रयिांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवले होते. राज्यभरातून याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या पुरस्कारांसाठी आलेल्या ४५० नामांकनांतून कठोर चाळण्यांनंतर महत्त्वाच्या निकषांच्या आधारे नऊ स्त्रयिांची ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२५’साठी निवड करण्यात आली आहे. यातील अनेक जणींनी कौटुंबिक, वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर उत्तम कार्य करून दाखवले आहे. आपल्या कार्यात त्यांनी अनेक स्त्रयिांनाही मदतीचा हात दिला आहे. तसेच अनेक अडचणींवर मात करून समाजात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ विजेत्या नऊ दुर्गांचा सत्कार लवकरच एका शानदार सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते केला जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.

● मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हिटस फाउंडेशन

● सहप्रायोजक : टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स, मे. बी. जी. चितळे डेअरी, केसरी टूर्स, पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, व्ही एम मुसळुणकर ज्वेलर्स, ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड

● पॉवर्ड बाय : डीडीएसआर ग्रुप, चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृह आणि क्रेडाई एम सी एच आय ठाणे रासरंग