मुंबई : तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाने भरलेल्या आणि नवोदित कलाकारांसाठी कला क्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पुणे आणि कोल्हापूर विभागाची प्राथमिक फेरी शनिवार, २५ नोव्हेंबर व रविवार, २६ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते रसिकप्रेक्षकांपर्यंत सर्वामध्येच या स्पर्धेबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली असून महाविद्यालयांमध्ये तालमीची लगबग सुरू आहे.
वैविध्यपूर्ण विषय आणि तितकीच अनोखी मांडणी, भव्यदिव्य नेपथ्य, लक्षवेधी प्रकाशयोजनेच्या जोडीला स्वरमग्न करणारे संगीत आणि ‘अरे आवाज कुणाचा..’ या आरोळीने दणाणलेले नाटय़गृह अशा ऊर्जेने भरलेला उत्साहपूर्ण माहौल ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या आठव्या पर्वाला शनिवारपासून सुरुवात होत असून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नागपूर अशा आठ केंद्रांवर ही स्पर्धा रंगणार आहे. पुणे आणि कोल्हापूरव्यतिरिक्त उर्वरित सहा विभागांसाठी शनिवार, २५ नोव्हेंबर ही प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख असेल, त्यामुळे वाट कसली पाहताय? विद्यार्थ्यांनो आजच आपल्या महाविद्यालयाचा अर्ज भरून स्पर्धेतील प्रवेश निश्चित करून घ्या.
हेही वाचा >>>दादर स्थानकात मध्य मार्गावरील फलाट क्रमांक बदलणार, गोंधळ उडण्याआधी जाणून घ्या नवे बदल!
आजवर तरुणाईने एकांकिकांच्या माध्यमातून सभोवताली घडणाऱ्या विविध घटनांवर भाष्य करत माणसाच्या जगण्यातील विविध पैलू उलगडून दाखवले आहेत, तर विनोदी कथेतून हास्याचे फवारे उडवण्यासह संवेदनशील विषयाला हात घालत समाजप्रबोधनाचे कामही ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर झाले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुण रंगकर्मीना रसिकांपासून मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांपर्यंत सर्वाची कौतुकाची भरभरून दाद मिळाली आहे. या स्पर्धेच्या प्रवाहातून जात असताना अनेकांना चित्रपट, मालिका व नाटय़ क्षेत्रात व्यावसायिकदृष्टय़ा करिअर करण्याची संधीही प्राप्त झाली. आता २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी पुणे व कोल्हापूर विभागाची प्राथमिक फेरी झाल्यानंतर २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाची प्राथमिक फेरी रंगेल. त्यानंतर मुंबई, ठाणे व नाशिक या विभागांची प्राथमिक फेरी २ आणि ३ डिसेंबर, तर रत्नागिरी आणि नागपूर विभागाची प्राथमिक फेरी ४ आणि ५ डिसेंबर रोजी होणार आहे. प्राथमिक फेरीचा टप्पा पार केल्यानंतर प्रत्येकी पाच एकांकिकांची सर्व ८ केंद्रांवर विभागीय अंतिम फेरी रंगेल आणि त्यात पहिल्या आलेल्या आठ विजेत्या एकांकिकांची महाअंतिम फेरी मुंबईत शनिवार, १६ डिसेंबर रोजी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनोरंजनसृष्टीतील दिग्गज ही स्पर्धा पाहण्यास हजेरी लावणार असून तरुण रंगकर्मीना मार्गदर्शनही करणार आहेत.
मुख्य प्रायोजक
’सॉफ्ट कॉर्नर
सहप्रायोजक
’भारती विद्यापीठ, पुणे
’शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचालित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिग अॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट
पॉवर्ड बाय
’केसरी टूर्स
’शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ मर्या, विजयनगर-अकलूज, ता. माळशिरस जि. सोलापूर
’श्री नेमिनाथ ज्वेलर्स
साहाय्य
’अस्तित्व
टॅलेंट पार्टनर
’आयरिस प्रॉडक्शन