मुंबई : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विकास प्रकल्प महानगरपालिकेने हाती घेतला आहे. याअनुषंगाने महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी महालक्ष्मी मंदिर परिसराला शनिवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान, सर्व कामांना गती देण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मुंबईत विविध प्राचीन धार्मिक स्थळे असून त्यात भुलाभाई देसाई मार्गावरील महालक्ष्मी मंदिराचा प्रामुख्याने समावेश होतो. मंदिर आणि परिसराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी अधिक चांगल्या नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करता याव्यात यासाठी मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि विकास प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहेत. महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील दुकाने / गाळे यांची पुनर्रचना करून सुसूत्रीकरण करणे व रस्त्यांची सुधारणा करणे, मार्गावरील भिंतींवर कलात्मक रंगरंगोटी करणे, पुरातन वारसा (हेरिटेज) शैलीतील विद्युत खांब आणि स्ट्रीट फर्निचर उभारणे, दिशा दर्शक फलक स्थापित करणे, मुख्य मार्गावर आकर्षक कमानी उभारणे, गर्दीच्या नियोजनासाठी आवश्यक उपाययोजना करणे, परिसरात आकर्षक विद्युत रोशणाई करणे, आवश्यकतेनुसार भित्तीशिल्पे साकारणे यासह अन्य विविध कामे मंदिर परिसरात करण्यात येणार आहेत. भूषण गगराणी यांनी या संपूर्ण मंदिर परिसरात फिरून पाहणी केली आणि या विकास कामांचा, तसेच सुशोभीकरण कामांचा आढावा घेतला.

दरम्यान, सर्व कामांना गती देण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. महालक्ष्मी मंदिर न्यासाकडून प्रस्तावित भक्तनिवास जागेची देखील गगराणी यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे मंदिराच्या मागील बाजूस मुंबई किनारी रस्त्याच्या दिशेने निर्गमन मार्ग व तेथील संभाव्य कामे, उपाययोजना यांची देखील त्यांनी माहिती जाणून घेतली. महालक्ष्मी मंदिरातील भाविकांचा ओघ पाहता सुशोभीकरण कामांचा वेग, त्याचप्रमाणे परिसरातील इतर कामे पूर्ण झाल्यानंतर भाविकांना जास्तीत जास्त नागरी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, तसेच दर्शन व इतर सर्व व्यवस्था सुलभ झाली पाहिजे, या दृष्टीने सर्व कामांमध्ये ताळमेळ साधण्याच्या सूचना गगराणी यांनी केल्या.

त्यावेळी डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे सल्लागार वास्तुतज्ज्ञ शशांक मेहंदळे उपस्थित होते. तसेच, महालक्ष्मी मंदिर न्यासाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन. गुपचूप, विश्वस्त एस. व्ही. डोंगरे, एस. एस. वैद्य, एस. के. दांडेकर, व्यवस्थापक एन. व्ही. कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.