लोकसत्ता विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाचा शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदासाठी काँग्रेस फारच आग्रही झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषद सभापती राम शिंदे यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि अमिन पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही आज भेट घेतली. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय तत्काळ घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत २९ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसची धावपळ सुरू झाली आहे. विधान परिषदेत विरोधी बाकांवर काँग्रेसचे सर्वाधिक आठ सदस्य आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे.

मात्र, विधानसभेप्रमाणे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित राहू नये म्हणून काँग्रेस नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून भेटीगाठींचे सत्र आरंभले आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत झालेल्या भेटीदरम्यान काँग्रेसने विधानसभा आणि विधान परिषदेत रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांनी विधानभवनात जाऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना लवकरच पत्र दिले जाणार आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेतेपद १० महिन्यांपासून रिक्त

एकीकडे विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मात्र अद्यापही रिक्तच ठेवण्यात आले आहे. महाविकास आघाडीकडून एकमताने भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. मात्र तांत्रिक बाब असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांकडून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. हे विरोधी पक्षनेतेपद शिवसेना ठाकरे गटाकडे असल्याने विधान परिषदेबरोबरच विधानसभेच्या विराेधी पक्षनेतेपदाचाही निर्णय व्हावा यासाठी ठाकरे गट आग्रही आहे.