मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदवीच्या (बी. फार्मसी) दुसऱ्या फेरीची निवड यादी १३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया १२ आक्टोबरपासून सुरू होत आहे.

औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीकृत प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये २९ हजार १६६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असली तरी अवघ्या १६ हजार ६९७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतले होते. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी ४४ हजार २८७ जागांपैकी २७ हजार ५९० जागा शिल्लक राहिल्या आहेत. त्यातच प्रथम वर्षासाठी प्रवेश बंदी केलेल्या १८ पैकी १३ महाविद्यालयांवरील बंदी उठविल्याने या महाविद्यालयांच्या जवळपास ८०० ते ९०० जागांची भर पडली आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.

दुसऱ्या फेरीच्या प्रवेशासाठीची निवड यादी १३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील १७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीला १२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणर आहे. १२ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरता येणार आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.

निवड यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ ते १७ ऑक्टोबर या कालावधीमध्ये जागा स्वीकृती करून प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी बंदी घातलेल्या २५ महाविद्यालयांमध्ये प्रवेशास मान्यता दिल्याने या अभ्यासक्रमांच्या जागांमध्येही वाढ होणार असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

मान्यतेमुळे प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू

औषधनिर्माणशास्त्र संस्थांना दरवर्षी पीसीआयकडून मान्यता घ्यावी लागते. या प्रक्रियेसाठी पीसीआयकडून दरवर्षी विलंब होत असून त्याचा फटका प्रवेश प्रक्रियेवर होतो. यंदा ३० सप्टेंबरपर्यंत चाललेल्या या प्रक्रियेमुळे पदवी व पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाली होती. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी चार महिन्यांपेक्षा अधिक काळ थांबावे लागले होते.