मुंबई : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राज्याची सत्ता काबीज करण्याच्या निर्धाराने विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपापासून सुरू झालेली धुसफुस अद्याप कायम आहे. काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळावा, अन्यथा आम्हीही ताकद दाखवू, असा थेट इशाराच शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूरमध्ये सोमवारी दिला. रायगड आणि नांदेडमध्येही आघाडीतील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर अनेक मतदारसंघांमध्ये आपापसांत मतभेद आहेत. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते मदत करीत नाहीत. याउलट बंडखोर काँग्रेस उमेदवारांच्या मागे ताकद उभी केली गेली आहे. काँग्रेसच्या स्थानिक खासदार प्रणिती शिंदे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झालेल्या नाहीत. यातूनच उद्धव ठाकरे यांनी प्रणिती शिंदे यांना आघाडीचा धर्म पाळण्याचा सल्ला जाहीरपणे दिला. सोलापूरमध्ये गडबड केलीत तर इतरत्र आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही ठाकरे यांनी काँग्रेसला दिला आहे.

हेही वाचा >>> निवडणूक कर्तव्यार्थ तैनात कर्मचाऱ्यांना निवडणुकीनंतरच्या दिवशी सुटी द्यावी

लोकसभेच्या वेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या विनंतीवरून प्रचाराला आल्याची आठवणही त्यांनी करून दिली. दुसरीकडे नांदेड उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे अब्दुल सत्तार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना शिवसेनेने या मतदारसंघात संगीता पाटील डक यांना उमेदवारीचे अधिकृत पत्र दिले आहे. नांदेड दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवारासह पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. रायगडमधील पराभवापासून उद्धव ठाकरे यांच्या मनात शेकापबद्दल अढी कायम आहे. विधान परिषद निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांना मदत करण्यास ठाकरे यांनी नकार दिला होता. आताही रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि शेकापने परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. उरणमध्ये शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा दावा करीत उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांची छायाचित्रे वापरत आहेत. त्यामुळे प्रचाराला केवळ आठवडाभराचा वेळ शिल्लक असताना मविआमधील गोंधळ अद्याप शमला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी मी शिवसेनेच्या दोन-तीन सभा सोडून सोलापुरात आलो होतो. आता प्रणिती यांना माझे सांगणे आहे, की त्यांनी सोलापूरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात उतरले पाहिजे. काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा आम्ही अन्यत्र आमची ताकद दाखवून देऊ.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेपक्षप्रमुख, शिवसेना (ठाकरे)