मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन प्रदेश कार्यकारिणी बुधवारी जाहीर केली असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे बहुतांश आमदार-खासदारांना त्यात स्थान देण्यात आलेले नाही. सुमारे ६० टक्क्यांहून अधिक नवीन चेहऱ्यांना कार्यकारिणीत संधी देण्यात आली असून काही नेते व पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे.

नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष , ६ सरचिटणीस , १६ चिटणीस , ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. माधव भांडारी यांची पुन्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून पक्षातील जुने नेते आणि राज्याची निवडणूकविषयक जबाबदारी सांभाळणारे सुनील कर्जतकर यांना मात्र या कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता खासदार व आमदारांना आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याने त्यांच्यावर संघटनेतील जबाबदारी देण्यात येऊ नये, अशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याने ६० टक्के नवीन चेहऱ्यांना यंदा संधी देण्यात आली आहे. यापैकी बहुतांश पदाधिकारी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता कमी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यकारिणीत उपाध्यक्षांची संख्या वाढवून आता १६ करण्यात आली असून त्यात सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर,  धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख, राजेंद्र गावीत, संजय भेगडे, अमर साबळे, स्मिता वाघ, विक्रम पावसकर आदींचा समावेश आहे. सरचिटणीसपदी आमदार रणधीर सावरकर,  अ‍ॅड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, विजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसांमध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. सचिवपदी भरत पाटील, अ‍ॅड. वर्षां डहाळे,  अरुण मुंडे, महेश जाधव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी आमदार. मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय संघटनमंत्रीपदी उपेंद्र कोठेकर (विदर्भ), मकरंद देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र), संजय कौडगे (मराठवाडा), शैलेश दळवी (कोकण), हेमंत म्हात्रे (ठाणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विजया रहाटकर, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हीना गावित, राज्यातील सर्व खासदार, आमदार आदींचा समावेश आहे. याखेरीज २८८ विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक आणि ७०५ मंडलांचे प्रभारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असे बावनकुळे यांनी नमूद केले.