मुंबई:  मंत्रिमंडळात आपले स्थान निश्चित असल्याचा दावा करणाऱ्या अनेक मातब्बर नेत्यांना मंगळवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने धक्का बसला आहे. शिंदे सरकारमध्ये आपण मंत्री होणारच असे सांगत सहकुटुंब- सहपरिवार मुंबईत दाखल झालेल्या आणि मंत्रीपदाचा कारभार चालविण्यासाठी अधिकाऱ्यांची फौज तयार करणाऱ्या उतावीळ नेत्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धक्क्याने अपेक्षाभंग झाला. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे निरोप जाताच उतावीळणपणे काहींनी आपल्याला मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी निमंत्रण आल्याचे सांगत, नातेवाईक, कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली.

मात्र मुख्यमंत्री नांदेड दौऱ्यावरून परतण्यास मध्यरात्र ओलांडल्याने या गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांकडे डोळा लावून बसले होते. मध्यरात्री झालेल्या बैठकीत काहींना पहिल्या टप्यात मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही याची कल्पना देण्यात आली. आपल्याला मंत्रीपद मिळणार नाही याची कल्पना येताच या बैठकीतच काही आमदारांनी उघड नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. अशाच प्रकारे कोकणातील रायगडमधील एका इच्छुक आमदाराने आपले मंत्रीपद नक्की असल्याचे सांगत अधिकारी- कर्मचाऱ्यांची फौजही तयार केली होती. एवढेच नव्हे तर कसा कारभार करायचा याची आखणीही सुरू केली होती. मात्र ऐनवेळी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे गटातील दोन वाद्ग्रस्त मंत्र्यांना तूर्तास बाजूला ठेवण्यात येणार होते. मात्र या दोन्ही आमदारांनी निर्वाणीची भूमिका घेतल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला त्याचा अन्य दोघांना फटका बसल्याचे सांगितले जाते. भाजपमध्येही काहींना ऐनवेळी मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आल्याने धक्का बसला आहे. मात्र मंत्रिमंडळात महिलांना स्थान न मिळाल्याने होणारी टीका तसेच पक्षांर्गत नाराजी दूर करण्यासाठी लवकरच पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून त्या वेळी स्थान मिळेल अशी इच्छुकांची समजूत भाजपकडून काढण्यात येत आहे.