मुंबई : मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार या सारख्या असंसर्गजन्य आजाराची (एनसीडी) लागण ही वयाच्या तिशीनंतर होते, असा एक समज आतापर्यंत होता. मात्र मागील काही वर्षांमध्ये लहान मुलांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. राज्यातील लहान मुलांमध्ये एनसीडीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे बाल्यावस्थेत व किशोरवयीन मुलांकडे एनसीडीच्या दृष्टीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यातील बाल अवस्थेतील व किशोरवयीन मुलांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी व असंसर्गजन्य आजारांबाबत समाजात जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मत आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी व्यक्त केले.
राज्यातील ६० लाखांहून अधिक बालके असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त आहेत. मधुमेह, दमा, जन्मजात हृदयरोग, सिकल सेल आजार आणि स्थूलता हे एकेकाळी प्रौढांचे समजले जाणारे आजार आता लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जागतिक स्तरावर होणाऱ्या मृत्यूंमध्ये एनसीडी आजारांने ७१ टक्के मृत्यू होत आहेत. भारतात तीनपैकी दोन मृत्यू या आजाराने होत आहेत.
महाराष्ट्रात मधुमेह टाईप १ प्रकारचे सुमारे दोन हजार नवे रुग्ण आणि जन्मजात हृदयरोगाचे २० ते २५ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील ३३ लाख बालकांना दम्याचा त्रास असून ८८ लाख बालकांना मानसिक विकार जडलेला आहे. राज्यामध्ये बाल्यावस्थेतील स्थूलतेचे प्रमाण वाढत असून २४ लाख लठ्ठ मुलांसह एकूण ६० लाखांहून अधिक मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने बाल अवस्थेतील असंसर्गजन्य आजार टाळण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गर्भारपणाच्या काळापासून काळजी घेतल्यास भविष्यात असे आजार टाळता येऊ शकतात. त्यांनी दुर्लक्षित घटकांवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे असल्याचे सचिव डॉ. निपूण विनायक यांनी सांगितले. समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
युनिसेफ इंडिया आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल अवस्थेतील असंसर्गजन्य आजारांवरील राज्यस्तरीय कार्यशाळा मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. निपुण विनायक यांच्यासह पीआयबी पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, एम्स नागपूरचे मुख्य संचालक डॉ. प्रशांत जोशी, युनिसेफचे महाराष्ट्र प्रमुख संजय सिंग आणि विवेक सिंग उपस्थित होते.
बाल्यावस्थेतील एनसीडी आजार ही केवळ आरोग्यविषयक समस्या नसून, शिक्षण, कौटुंबिक उत्पन्न तसेच मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम करतात. एनसीडी आजारामुळे कोणत्याही बालकाची शाळेत अनुपस्थिती किंवा त्याला एकटेपणा जाणवू नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे पीआयबीच्या पश्चिम विभागीय महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितले.
यावेळी गटचर्चेत आरोग्यसेवा तज्ज्ञांनी बाल्यावस्थेत एनसीडींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी शालेय आरोग्य तपासणी, इन्सुलिन आणि इन्हेलरसारखी औषधे मोफत उपलब्ध करून देणे, जिल्हास्तरीय एनसीडी दवाखाने स्थापन करणे आणि शैक्षणिक प्रणालींमध्ये मानसिक आरोग्य सहाय्याचा समावेश करणे, अशा उपाययोजनांवर भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.