मुंबई : अतिवृष्टी, शेतजमीन खरवडून जाणे, पिके पाण्याखाली गेल्यामुळे अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत १७ हजार हेक्टरहून जास्त क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. भंडारा, गोंदिया, पालघर, रायगड आणि गडचिरोलीतील भात रोपांची लागवडही रखडली आहे.

गत आठवड्यात पश्चिम विदर्भाला मुसळधार पावसाचा फटका बसला. अमरावती विभागाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडवून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी पिके सतत पाण्याखाली राहिल्यामुळे कुजून गेली आहेत. त्यामुळे अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत सुमारे १७,०९२ हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्यामुळे आणि सह्याद्री घाटाच्या परिसरात अति पावसामुळे दुबार पेरणीची टांगती तलवार कायम आहे.

खरीप हंगामातील पेरण्या दहा जूनपर्यंत ८१ टक्क्यांवर गेल्या आहेत. राज्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र १४४.३६ लाख हेक्टर असून, ११५.७९ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मराठवाड्याने पेरण्यांमध्ये आघाडी घेतली असून, सरासरीच्या तुलनेत सोलापुरात १०७ टक्के, लातूरमध्ये ९५ टक्के, नांदेडमध्ये ९४ टक्के आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ९३ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

मका लागवड गतीने सुरू असून, सरासरीच्या १३१ टक्क्यांवर लागवड झाली आहे. राज्यात मक्याचे क्षेत्र सरासरी ९.३३ लाख हेक्टर असून, आजघडीला १२ लाख २६ हजार ७२० हेक्टवर पेरा झाला आहे. सोयाबीनची लागवड सरासरीच्या ९३ टक्के (४३.८२ लाख हेक्टर), उडदाचा पेरा ८९ टक्के (३.१९ लाख हेक्टर), कापसाचा पेरा ८४ टक्के (४४.८७ लाख हेक्टर), तुरीची लागवड ८४ टक्क्यांवर (१०.७० लाख हेक्टर) गेली आहे.

भात लागवड रखडली

मे महिन्याच्या अखेरीस राज्यात वेगाने दाखल झालेल्या पावसाने जूनच्या सुरवातीला पावसाने ओढ दिली. त्यामुळे भाताची रोपे वेळेत टाकता आली नाहीत. त्यानंतर टाकलेल्या रोपांची रोपांची अपेक्षित वाढ झाली आहे. मात्र, आता पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील भात पट्ट्यात भाताची लागवड रखडल्याचे चित्र आहे. सरासरीच्या तुलनेत भंडाऱ्यात फक्त १० टक्के, गोंदियात ११ टक्के, पालघरमध्ये १६ टक्के, रायगडमध्ये २० टक्के आणि गडचिरोलीत ३१ टक्के लागवड झाली आहे. वरील जिल्ह्यांत राज्यात सर्वांत कमी पेरा झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यभरात खरीप पेरण्यांनी वेग घेतला आहे. मराठवाड्यात चांगला पेरा झाला आहे. भात रोपांची लागवड आता गती घेईल. दुबार पेरणी कराव्या लागणाऱ्या भागात कृषी विभाग शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल, अशी माहिती कृषी विभागाच्या विस्तार आणि प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी यांनी दिली.