मुंबई : शिक्षण संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून घातलेल्या गोधळानंतर पहिली यादीही पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे पालक व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. अकरावीचे प्रवेश विलंबाने झाल्याने विद्यार्थ्यांचे होणार नुकसान कसे भरून काढणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तर प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे यासाठी यंदा राज्य मंडळाने दहावी परीक्षा १५ दिवस आधी घेतली आणि निकाल १३ मे रोजी जाहीर केला. निकाल जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांवर दबाव टाकून उत्तरपत्रिका लवकर तपासून घेतल्या. त्यानंतर २१ मेपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला. मात्र यंदा प्रथमच राज्यभरात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया नोंदणी पुढे ढकलण्यात आली. नोंदणी प्रक्रिया २६ जूनपासून सुरू करण्यात आली.

मात्र सातत्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी व पालक हतबल झाले होते. तांत्रिक अडचणींचा सामना करत अखेर ७ जून रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी पूर्ण झाली. परंतु तांत्रिक अडचणीचे शुक्लकाष्ठ कायम राहिल्याने १० जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणत्तवा यादी २६ जून रोजी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना २६ जूनपासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया सुरळीत चालेल अशी अपेक्षा होती.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी दिवसभर संकेतस्थळाला भेट दिली. यादरम्यान संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर गुरूवारी रात्री उशीरा शिक्षण संचालनालयाने पुन्हा पहिली गुणवत्ता यादी लांबणीवर टाकत ती ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहावीची परीक्षा १७ मार्च रोजी संपल्यापासून तीन महिने विद्यार्थी घरी बसून आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.