मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने (एसटीए) राज्यभरातील ई-बाइक टॅक्सी सेवांसाठीचे किमान भाडे अधिकृतपणे मंजूर केले. त्यामुळे येत्या काही दिवसात ई-बाइक टॅक्सी राज्यात अधिकृतपणे धावू लागेल. ई-बाइक टॅक्सीचा पहिला टप्पा १.५ किमीचा असेल. पहिल्या टप्प्यातील भाडे १५ रुपये निश्चित करण्यात आले असून त्यापुढील प्रतिकिमीसाठी १०.२७ रुपये आकारले जातील.
मुंबईसह राज्यात बाइक टॅक्सीला परवानगी नसताना अनेक अॅग्रीकेटरद्वारे आधीच बेकायदेशीरपणे सेवा सुरू आहे. विशेषत: मुंबई महानगर प्रदेशात बाइक टॅक्सीची सेवा अनधिकृतपणे सुरू होती. दरम्यान, परिवहन विभागाने मुंबई महानगर प्रदेशात कार्यरत असलेल्या १२३ बाइक टॅक्सींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती परिवहन विभागाने दिली.
राज्य परिवहन प्राधिकरणाने उबर इंडिया सिस्टीम प्रा.लि., रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि., अॅनी टेक्नोलॉजीस प्रा.लि. यांना ३० दिवसाकरीता ‘मुंबई महानगर क्षेत्राकरीता’ तात्पुरता परवाना देण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली. तसेच, अर्जदाराकडून ३० दिवसाच्या आत सर्व बाबींची अटींची पूर्तता झाल्यानंतर पक्का परवाना प्रदान करण्याच्या अंतिम मान्यतेसाठी राज्य परिहवन प्राधिकरणासमोर सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले, अशी माहिती परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५’ अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या विद्युत दुचाकी वाहनांचे भाडेदर राज्यात पहिल्यांदा करण्यात आली. तसेच, राज्यात हे भाडेदरामध्ये एकसूत्रता आणि समानता असण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक पार पडली होती. या बैठकीत ‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५’ अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या विद्युत दुचाकी वाहनांचे भाडेदर प्रति किमी १०.२७ रुपयांप्रमाणे आकारणी करण्यास मान्यता दिली. अॅग्रीगेटर इ-बाइक टॅक्सीचा पहिला टप्पा १.५ किमी असेल. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे भाडे १५ रुपये असेल व त्यानंतर पुढील प्रत्येक किमी दराप्रमाणे आकारणी करण्यात येईल, अशी माहिती परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राज्य सरकारने एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरी भागात बाइक टॅक्सीसाठी चालविण्यास परवानगी दिली. राज्य सरकारने ४ जुलै २०२४ रोजी ‘महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम, २०२५’ बद्दल अधिसूचना जाहीर केली. राज्य परिवहन सचिव संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली एसटीएने १८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत भाडे मंजूर केले आणि ते राज्यभर लागू असतील, असे प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) अधिकाऱ्याने सांगितले.
एसटीए बैठकीच्या इतिवृत्तांवर स्वाक्षरी झाल्यानंतर, भाडे जाहीर करण्यात आले. वाहतूक प्राधिकरणाने खटुआ समितीने तयार केलेल्या सूत्राचा वापर करून बाईक टॅक्सींचे भाडे निश्चित केले. जे रिक्षा आणि टॅक्सींसाठी दर मिळविण्यासाठी वापरले जात होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.