मुंबई : राज्यात अतिवृष्टी, महापुराचा शेती, पशुधनासह सिंचनासाठीच्या विहिरींनाही मोठा फटका बसला आहे. राज्यभरातील अकरा हजार विहिरी गाळ साचून, कठडे कोसळून, नदीच्या राडारोड्यामुळे बुजून गेल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निधी किंवा राज्य आपत्ती निधीत विहिरींचा समावेश नाही. त्यामुळे राज्य सरकारने निकषांच्या बाहेर जात प्रति विहीर ३० हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचा सोलापूरसह मराठवाड्याला फायदा होणार आहे. आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी नुकसानग्रस्त विहिरींना मदत करण्याची आग्रही मागणी केली होती.
देशाच्या बहुतांश भागात शेतीसाठीची सिंचन व्यवस्था कालव्यांद्वारे केली जाते. मात्र, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणामध्ये प्रामुख्याने विहिरी, कुपनलिकांचा वापर केला जातो. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांमध्ये विहिरींना नुकसान भरपाई देण्याचा निकष नाही. त्यामुळे विहीर बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नव्हती. या निर्णयामुळे विहिरीच्या दुरुस्ती काहीसा हातभार लागणार आहे.
एनडीआरएफच्या निकषांमध्ये विहिरींच्या नुकसानीचा समावेश नाही. पण, सुमारे अकरा हजार विहिरींचे नुकसान झाले आहे. त्यांना मदत म्हणून एनडीआरएफच्या निकषांबाहेर जावून राज्य सरकार प्रति विहीर ३० हजार रुपयांची मदत करणार आहे. दरवर्षी नदीकाठावरील विहिरींचे महापुरामुळे नुकसान होते. पाणी उपसा पंप, पाईप, वीजेची केबल वाहून जाऊन नुकसान होते. अशा शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असे माहिती आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली.
अतिवृष्टी, महापुरातील नुकसान
विहिरी – ११,०००
दुधाळ जनावरांचा मृत्यू – ५०८५
ओढकाम करणारी जनावरे, बैल – ४३९०
कोबड्यांचा मृत्यू – १८,७४९८
नुकसान झालेले जनावरांचे गोठे – १९०२
पडझड झालेली घरे – ४२,६२२
पडझड झालेल्या झोपड्या – ५१९
पूर्णत: नष्ट झालेली घरे – २१५९
दुकाने, पानटपरी नुकसान – १३७०
जखमी – ७