मुंबई : मुंबईमधील जी.टी., कामा आणि सेंट जॉर्जेस ही रुग्णालये जे. जे. रुग्णालयाशी संलग्न आहेत. मात्र राज्य सरकारने जी. टी. रुग्णालयाचे १०० विद्यार्थी क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकाची पूर्तता करण्यासाठी जी. टी. रुग्णालयबरोबरच कामा रुग्णालयाचा वैद्यकीय महाविद्यालयात समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे.

हेही वाचा >>> आता विकासकांना तीन स्वतंत्र बँक खाती बंधनकारक; प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारात शिस्तीच्या अनुषंगाने महारेराचा निर्णय

मुंबईमध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास सलंग्न ५०० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जी.टी. रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार विद्यार्थी क्षमता व रुग्णखाटांचे गुणोत्तर राखणे जी.टी. रुग्णालयाला शक्य नाही. ही बाब लक्षात घेता जवळच असलेले कामा रुग्णालय हे जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने जी.टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी विविध पदांवरील ५६ अध्यापकांची नुकतीच नियुक्ती केली आहे. तसेच महाविद्यालयासाठी आवश्यक असणारे सर्व विषयांचे विभाग, तासिका कक्ष, खाटांची संख्या, प्रयोगशाळा आणि तत्सम गोष्टींची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जी.टी. रुग्णालयातील ५२१ आणि कामा रुग्णालयातील ५०५ अशा एकूण १०२६ खाटांची संख्या होणार आहे.

हेही वाचा >>> समुद्रालगतच्या वस्त्या, इमारतींना विकासाची प्रतीक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विभागनिहाय खाटांची संख्या जी. टी. रुग्णालयातील वैद्यक औषधशास्त्र विभागाच्या ११६ खाटा, लहान मुले विभाग ६० खाटा, त्वचारोग विभाग २२ खाटा, मानसोपचार विभाग ३०, शस्त्रक्रिया विभाग ११७, अस्थिव्यंग विभाग ४८, नेत्रविभाग ३०, कान – नाक – घसा विभाग २८, अतिदक्षता विभाग २०, क्षयरोग विभाग ५० खाटा आहेत. तर कामा रुग्णालयामध्ये आयपीएनसी कक्षात ६९, स्त्रीरोग शस्त्रक्रिया विभागात ६४, शस्त्रक्रिया विभागात १९, एचडीयू कक्षात १६, लहान मुलांच्या कक्षात ३४, यूपीएनसी कक्षात ३३, लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात २१, प्रसूती कक्षात १२, एएनसी कक्षात ६४ आणि अतिदक्षता विभागात ६, नवीन रुग्ण कक्षात ४०, कर्करोग कक्षात ५२, वैद्यकशास्त्र विभागात ४०, वैद्यकीय गर्भपात कक्षात २०, परिचारिका कक्षात १५ अशा एकूण ५०५ खाटा कामा रुग्णालयामध्ये आहेत.