मुंबईः अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी ओला दुष्काळ अशी संकल्पनाच नसल्याचे सांगत सरकारने मंगळवारी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. राज्यातील बळीराजावर कोसळलेल्या अभुतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळातील सर्व सुविधा आणि उपोययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
येत्या दोन तीन दिवसात नुकसानीचे आकडे आल्यानंतर मदतीबाबत एक सर्वंकष धोरण तयार करून शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल.या सर्व मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात केली जाईल. विशेषतः शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सर्व मदत देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्य म्ंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. सरकार पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
कर्ज वसूली थांबवली
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे आदेशही बँकाने दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतकरी सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी व आवश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे, अशा केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन, झालेल्या नुकसानीवरही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे. नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्राला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत अशा व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही महिन्यांत राज्यात सातत्याने अतिवृष्टी झाली. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीचे पंचनामे झाले असून बाधितांना २२१५ कोटी रुपये वितरित करण्यात येत आहेत. ई-केवायसीची अट शिथिल करून हे पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस झाला आहे. ज्या भागात नुकसानीचे पंचनामे झाले होते. तेथेही अतिवृष्टी झाली असून २४ तासात ६५ मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस १२ जि्ह्यात झाला आहे. तर ३२ जिल्हयांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून सुमारे ६० लाख हेक्टर म्हणजे दीड कोटी एकर शेतीला फटका बसला आहे. अतिवृष्टीत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून २०९ मंडळात १० वेळा अतिवृष्टी झाल्याची माहिती मंत्रिमंडळास देण्यात आली. काही ठिकाणी डोंगरावर पाऊस झाला असून शेतीच्या ठिकाणी पाऊस झाला नसला तरी पुराच्या पाण्याने शेतीचे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.