मुंबई : नागरिकांना सर्व शासकीय सेवा व योजनांचा लाभ ‘आपले सरकार ’ संकेतस्थळावरुन मिळावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिल्या. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नागरिकांना सुलभ पद्धतीने लाभ देण्याचा शासनाचा मानस असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. सुशासनामध्ये सुधारणा करुन ‘ इज ऑफ लिव्हींग ’ च्या दृष्टीने ‘ आपले सरकार ’ संकेतस्थळ टप्पा दोन हे दोन ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित करावे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.

या सेवांसंदर्भात शासनाने ‘समग्र’ संस्थेशी करार केला आहे. शासकीय सेवा व योजनांचे आपले सरकार संकेतस्थळावर एकत्रीकरण करण्यासंदर्भात फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. त्यावेळी सर्व विभागांची संकेतस्थळे किंवा ॲपचे एकत्रीकरण करावे, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या. या बैठकीस माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश कुमार, राज्यसेवा हक्क हमी आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

राज्यातील प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ व सेवा कमीत कमी कालावधीत आणि विनासायास मिळावा, यादृष्टीने नागरिक केंद्रीत दृष्टीकोनातून ‘ आपले सरकार (टप्पा २) ’ संकेतस्थळ विकसित करावे. या संकेतस्थळावर शासनाच्या सर्व सेवा नागरिकांना टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहे. यादृष्टीने २६ नोव्हेंबर (संविधान दिन), २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) आणि १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) अशा तीन टप्प्यातील वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना फडणवीस यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

सेवा हक्क कायद्यात योजनांच्या लाभाचीही हमी

सध्या सेवा हक्क हमी कायद्यामध्ये आपण नागरिकांना सेवांचीच हमी देत आहोत. मात्र यापुढे पात्रतेच्या निकषावर योजनांच्या लाभाची हमीही नागरिकांना देण्यात यावी, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या. नागरिकांनी अर्ज केल्यानंतर त्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावी. अर्जदार नागरिकांना त्यांच्या अर्जाची माहिती प्रत्येक टप्प्यावर देण्यात यावी. तसेच योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर किंवा सेवा मिळाल्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर नोंदविण्याची सुविधा असावी. त्यांच्या तक्रारींचे निराकरणही ऑनलाइन पद्धतीनेच व्हावे. योजनांचे लाभ, सेवा अधिक सोप्या पद्धतीने, कमी कालावधीत मिळण्यासाठी अर्जातील रकाने आणि सोबत जोडण्यात येणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करावी. सर्वच योजनांचे लाभ हे ‘महाडीबीटी ’ संकेतस्थळाद्वारे देण्यात यावेत. कुठल्याही प्रकारे ऑफलाइन पद्धत वापरण्यात येऊ नये. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना जाण्याची वेळ येऊ नये, अशा पद्धतीने कार्यपद्धती असावी. अर्ज आणि सेवा मंजुरीचे टप्पे नागरिकांना संकेतस्थळावर ऑनलाईनच कळतील, अशी व्यवस्था कराव, आदी सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

राज्य शासन व्हॉट्सॲप च्या माध्यमातून सेवा देण्यासाठी कार्यवाही करीत आहे. नागरिकांना सहज, सोप्या पद्धतीने व कमी कालावधीत शासकीय योजनांचा लाभ आणि सेवा मिळाव्यात, ही राज्य शासनाची भूमिका आहे. प्रत्येक विभागाने यासाठी समर्पित भावनेने काम करून ही कार्यपद्धती लागू करावी, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली. बैठकीस पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, समग्र संस्थेचे अध्यक्ष गौरव गोयल यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.