मुंबई : मशिदींवरील भोंग्यांवरून भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भोंग्यांबाबत कठोर धोरण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भोंग्यांबाबत येत्या एक – दोन दिवसांत मार्गदर्शक सूचना प्रसृत करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर सांगितल़े

मशिदींवरील भोंगे उतरविण्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रमझान संपल्यानंतर म्हणजेच ३ मेनंतर मशिदींवरील भोंगे उतरविले नाहीत, तर मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा वाजविण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली असून, ठाकरे यांच्या भूमिकेला भाजपनेही पािठबा दिल्याने राज्यात सरकार विरूद्ध भाजप-मनसे असा संषर्घ निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भोंग्यांच्या मुद्यावरून राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची चिन्हे दिसत असल्याने सरकारी पातळीवर वेगाने हालचाली सुरू आहेत़ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षां निवासस्थानी भेट घेऊन कायदा सुव्यवस्थेबाबत चर्चा केली. त्यानंतर भोंग्यांबाबत राज्यात एकच धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हे धोरण ठरविण्याची जबाबदारी पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.

पोलिसांनी मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्यानंतर यासंदर्भात अधिसूचना काढून राज्यभरात नियमावली लागू केली जाईल, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली. कोणीही धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. जाणीवपूर्वक कोणाकडून प्रयत्न झाला आणि त्यात दोषी आढळल्यास ती संघटना असो, व्यक्ती किंवा आणखी कोणीही असो, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल , असा इशारा वळसे पाटील यांनी दिला.

सर्व प्रार्थनास्थळांनी परवानगी घ्यावी

नाशिक : सर्वधर्मिय प्रार्थनास्थळांनी ३ मेपर्यंत भोंग्यांबाबत रितसर परवानगी घ्यावी, अन्यथा या मुदतीनंतर विनापरवाना सर्व भोंगे जप्त करण्याचा इशारा नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिला आहे. तसेच मशिदीच्या १०० मीटरच्या परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे अजानच्या वेळेत हनुमान चालीसा वाजविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.