मुंबई : नव्याने उत्पन्न होणाऱ्या विषाणूजन्य आजारांचे मोठे आव्हान जगासमोर उभे राहिले आहे. देकोव्हिड, कांजण्या, जीबीए विषाणू अशा विविध प्रकारच्या विविध विषाणूंचे भविष्यातील आव्हान लक्षात घेऊन नॅशनल इस्टिट्यूट आँफ व्हायराँलाँजीच्या(एनआयव्ही) धर्तीवर राज्यात महाराष्ट्र विषाणू शास्त्र संस्था (एमआयव्ही) स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतली आहे. या संस्थेसाठी ६० कोटी रुपयांच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली आहे.
विषाणूजन्य आजारांवरील संशोधनासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे अंतर्गत कार्यरत असणारी नॅशनल इस्टिट्यूट आँफ व्हायराँलाँजी ही संस्था पुण्यात आहे. १९५२मध्ये या संस्थेची स्थापना विषाणू संशोधन केंद्र म्हणून झाली असून विषाणूजन्य रोग व सांसर्गिक आजारांच्या संशोधन करून त्यावर प्रतिबंध व नियंत्रयणासाठी काम करते. मात्र या संस्थेवर असलेल्या ताणाचा विचार करून राज्यात अशी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोविडच्या काळात तर प्रचंड ताण पडला होता. विषाणूचे कोणतेही नमुने तपासणीसाठी पाठवल्यावर अनेकदा विलंब होते. त्यामुळे उपचार आणि प्रतिबंध करण्यास विलंब होतो. त्यामुळे पुण्यातील राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या उपसंचालकांनी एनआयव्हीच्या धर्तीवर राज्यात एमआयव्ही स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली असून जागा, आवश्यक यंत्रसामुग्री व मनुष्यबळासाठी ६० कोटी रुपयांच्या रक्कमेच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
त्यानुसार एमआयव्ही हा प्रकल्प संपूर्णपणे टर्न की पध्दतीने चालवण्यात येणार आहे. मात्र सेवा व वस्तू पुरवणा-या कंत्राटदारामार्फत हा प्रकल्प चालवण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे या संस्थेत सर्व उपकरणे आंतरराष्ट्रीय दर्जा व मानके असलेली वापरण्यात येणार आहेत. अनेकदा प्रकल्पांसाठी उपकरणे विकत घेतली जातात किंवा आयात केली जातात. पण प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित होण्यासाठी विलंब लागतो. त्यामुळे महागडी उपकरणे नादुरुस्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेल्या बीएसएल-तीन(व्हायराँलाँजी व बॅक्टिरयालाँजी) पायाभूत सुविधा व प्रयोगांसाठी आवश्यक यंत्रणा सुविधा निर्माण केल्यावरच उपकरणे खरेदी करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत. या प्रकल्पासाठी उपकरणे यंत्रे व इतर साहित्य सामुग्रीची खरेदी ही मुंबईतल्या आरोग्य भवनातील महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरणाकडून खरेदी करण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहे.
