मुंबई : राज्यात सर्वदूर मोसमी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे मे महिन्यातच सरासरीपेक्षा १० पटीने अधिक पावसाची नोंद झाली. परिणामी शेतशिवारात सर्वत्र चिखल असल्याने खरीप हंगामपूर्व मशागतींचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे मशागत न करता ‘वाफसा’ आल्यानंतरच पेरणी करावी लागणार आहे. काळ्या, खोल जमिनीत पेरणीयोग्य वाफसा येण्यासाठी किमान १० ते १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. परंतु यापुढेही पाऊस सुरू राहिल्यास पेरण्या लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मे महिना हा खरीप पेरणीपूर्व मशागतीचा असतो. पहिला वळिवाचा पाऊस झाल्यानंतर शेतकरी मशागतींना सुरुवात करतात. पूर्वमशागती या पिकांच्या वाढीसाठी गरजेच्या असतात. मात्र, पूर्व मशागतींच्या काळात राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागांत पूर्व मशागतींचा खोळंबा झाला आहे. पाऊस कमी होऊन ऊन पडले तरीही पेरणीयोग्य ‘वाफसा’ येण्यासाठी १० ते १५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. ‘वाफसा’ आल्यानंतरच पूर्व मशागती न करता थेट पेरण्या कराव्या लागणार आहेत.
सरासरी ९८७.६ टक्के अधिक पाऊस
- राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून वळीव आणि शेवटच्या आठवड्यात पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ घातला. सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मे महिन्यातील सरासरीपेक्षा १० पटीने अधिक पाऊस पडला आहे.
- मे महिन्यामध्ये राज्यात सरासरी १७.७ मिलिमीटर पाऊस पडतो, यंदा १७४.८ मिलिमीटर म्हणजे सरासरी ९८७.६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. अतिमुसळधार पावसामुळे ओढे, नाले, बंधारे, तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे काळ्या, खोल जमिनीत चिखलाचे साम्राज्य आहे.
१५ जून ते ५ जुलै पेरण्यांचा मुख्य हंगाम
राज्यात दरवर्षी सरासरी ७ जूनपासून पेरण्या सुरू होऊन जुलैअखेरपर्यंत पेरण्या सुरू राहतात. १५ जून ते ५ जुलै हा पेरण्यांचा मुख्य काळ असतो. या २० दिवसांत बहुतेक पेरण्या पार पडतात. त्यामुळे तातडीने पाऊस थांबला तरीही आठवडाभर विलंबाने पेरण्या सुरू होतील. पावसाची संततधार कायम राहिल्यास पेरण्या अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.