मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्पादन शुल्क विभागाने राज्यात नव्याने ३२८ मद्यविक्री परवाने देण्यासंदर्भात आखलेल्या धोरणाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी विधिमंडळाच्या पायऱ्यावर मंगळवारी आंदोलन केले. ‘बाटलीवाल्या सरकारच्या धिक्कार असो’, ‘दारुवाल्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा यावेळी आमदारांनी दिल्या.
मद्यविक्री दुकानाच्या प्रस्तावित ३२८ नव्या परवान्यासदंर्भात ‘लोकसत्ता’ने रविवारी वृत्त प्रकाशित केले होते.
विधान परिषदेत विरोधकांनी मद्य परवान्यांच्या धोरणवर चर्चा करण्याची मागणी केली होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळाच्या पायऱ्यावर आज आमदारांचे आंदोलन झाले. ‘विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने राज्याची तिजोरी खाली केली आहे.
लाडक्या बहिणींचे संसार मद्याचा सुकाळ आणून हे सरकार उध्वस्त करत आहे. नवे मद्यपरवाने देवून जनजीवन विस्कळीत करणारे धोरण सरकारने आखले आहे. मद्यविक्रीचे नवे परवाने बहुतांश खाजगी साखर कारखानदारांना तेसुद्धा अल्प किमतीत मिळणार आहेत. २० टक्के नवे मद्यविक्री परवाने देवून हे सरकार महसुल वाढवत नसून शासनाचा महसुल जिरवत आहे, असा आरोप दानवे यांनी केला.