मुंबई : मोसमी पाऊस रविवारी (२५ मे) राज्यात दाखल झाला असून, देवगड मध्ये तसेच कर्नाटक, संपूर्ण गोव्यात मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या सोळा वर्षांतील नोंदीनुसार राज्यात पाऊस लवकर दाखल झाला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी वारे रविवारी तळकोकणात दाखल झाले आहेत. तसेच कर्नाटक, संपूर्ण गोवा मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून, पुढील तीन दिवसांत पाऊस मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रापर्यंत धडक देण्याचा अंदाज आहे. यंदा केरळमध्ये वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. अंदाजित वेळेपेक्षा ८ दिवस अगोदर आणि मागील १६ वर्षांच्या तुलनेत मोसमी वारे लवकर दाखल झाले. दरम्यान, मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, उर्वरित महाराष्ट्रात, कर्नाटक, आंध्रप्रदेशच्या काही भागात आणि तामिळनाडूच्या उर्वरित भागात पुढील ३ दिवसांत मोसमी वारे दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस सात जून रोजी दाखल होतो. पण, यंदा केरळमध्ये मोसमी पाऊस लवकर दाखल झाला होता. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत होते. त्यानुसार रविवारी मोसमी वाऱ्यांनी देवगड मध्ये हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मोसमी पावसासाठी अधिक पोषक वातावरण निर्माण केले. राज्यात मोसमी वारे दाखल होत असतानाच कर्नाटक, संपूर्ण गोव्यात मोसमी वाऱ्यांनी मुसंडी मारली आहे.

तळकोकणात वेळेअगोदर आगमन

मोसमी पाऊस सरासरी पाच जून रोजी गोव्यात आणि सात जून रोजी तळकोकणात दाखल होतो. यंदा ११ दिवस अगोदरच पाऊस तळकोकणात दाखल झाला आहे. पुण्यात सरासरी १० आणि मुंबईत ११ जून रोजी पाऊस दाखल होतो. यंदा पुणे आणि मुंबईतही नियोजित वेळेपूर्वीच मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात मोसमी पाऊस दाखल झालेल्या तारखा

२०२४ – ६ जून

२०२३ – ११ जून

२०२१ – ५ जून

२०२० – ११ जून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ – २० जून