Maharashtra Rain Alert Today : गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, आजपासून सुरू होणारा पाऊस पुढील दोन ते तीन दिवस पडणार असल्याची शक्यता आहे. यावेळी काही भागात कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

संपूर्ण राज्यात मागील काही दिवसांपासून फारसा पाऊस पडलेला नाही. मुंबईसह इतर भागात पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी तापमानात वाढ होऊन उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आजपासून पाऊस पुन्हा एकदा जोर धरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. हा पाऊस साधारण दोन ते तीन दिवस सलग पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

कमी दाब क्षेत्र

दक्षिण ओडिशाच्या व आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील बंगालच्या उपसागरात शुक्रवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील दोन दिवसांत ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परिणामी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात उत्तर कोकणात शनिवार ते सोमवार या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पावसाचा अंदाज कुठे

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, रविवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत काही भागात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना या जिल्ह्यात शनिवारपासून पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

तापमानात घट

गेले काही दिवस राज्यातील तापमानाचा पारा चढा आहे. अनेक भागात ३१ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदले जात आहे. दरम्यान, पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यानंतर तापमानात घट होऊन काहीसा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

सप्टेंबरमध्ये १०९ टक्के पाऊस

सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता असून, देशात १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची, तर कोकणात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पूर्वोत्तर राज्य, पूर्व भारताचा काही भाग, दक्षिण द्वीपकल्पाचा बहुतांश भाग आणि देशाच्या उत्तरेत असलेल्या जम्मू- काश्मीर, लडाख वगळता देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

ला-निना स्थिती

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात सध्या सर्वसाधारण स्थिती (एन्सो न्यूट्रल) आहे. मान्सून हंगाम अखेरच्या टप्प्यात येताच प्रशांत महासागरात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सून आणि हिवाळ्यात ‘ला-निना’चा प्रभाव राहू शकेल. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सर्वसाधारण पातळीवर असून, मान्सून अखेरीस ‘आयओडी’ ऋण (निगेटिव्ह) होण्याचा अंदाज आहे.