मुंबई : संपूर्ण राज्यात बुधवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. तर काही भागात संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शुक्रवारपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचा प्रभाव म्हणून शुक्रवारपासून राज्यभरात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. काही भागात अतिवृष्टीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागत होता. अनेक दिवसांनी बुधवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे काहीसा दिलासा मिळाला. मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर कोकण, विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईच्या तापमानात घट

मुंबईत मागील काही दिवस ३० अंशापुढे तापमान नोंदले जात होते. मुंबईत बुधवारी संपू्र्ण दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. परिणामी तापमानात घट झाली. हवामान विभागा्चाय कुलाबा केंद्रात गुरुवारी २८.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईत १ ते १३ ऑगस्टपर्यंत कुलाबा येथे ४७.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६४.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भातही तापमानात घट

गेले काही दिवस विदर्भात सर्वाधिक तापामानाची नोंद झाली होती. मात्र, बुधवारी पावसाळी वातावरमामुळे तसेच काही ठिकाणी पाऊस पडल्यामुळे येथील तापमानातही घट झाली आहे. मागील काही दिवस अकोला येथे सर्वाधिक तापामान नोंदले होते. मात्र, बुधवारी अकोला येथे २७.२ अंश सेल्सिअस तामानाची नोंद झाली.

पावसाचा अंदाज कुठे

मेघगर्जनेसह पाऊस

पालघर, रायगड, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, धाराशिव

मुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

अतिमुसळधार पाऊस

अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ