मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई व राज्यातील १५ उच्च शिक्षण संस्थांबरोबर ‘प्री-इन्क्युबेशन’ केंद्रे स्थापन करून उद्योजकतेसाठीची वैचारिक कौशल्ये वृध्दींगत करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत उच्च शिक्षण संस्थामधील शिक्षक व विद्यार्थ्यांचा क्षमता विकास, नवउद्योगांसाठी चालना व त्यासाठी आवश्यक मास्टर क्लासेस, उदयोन्मुख उद्योजक विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेशन चॅलेंजेस व यशस्वी विद्यार्थ्यांसाठी बुटकॅम्पस असणार आहे.
या सामंजस्य करारांतर्गत ५० पेक्षा अधिक शिक्षकांसाठी क्षमता विकास, १२ हजार ५०० विद्यार्थ्यांपर्यंत उद्योजकतेसंदर्भाताल वैचारीक कौशल्ये पोहोचवणे व साधारण ५० विद्यार्थ्यांना नवउद्योगांसाठी मार्गदर्शन व मदत करण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचा हा पहीला टप्पा असून यानंतरही उच्च शिक्षण संस्थाबरोबर असे करार करण्यात येणार आहेत. प्री-इन्क्युबेशन केंद्रांच्या माध्यमातून नवकल्पना आणि ‘स्टार्ट-अप’ना चालना मिळणार आहे. तसेच महाविद्यालयातून ‘स्टार्ट-अप’ची निर्मिती करण्यासही मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने तीन ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापना करण्याची ७ नोव्हेंबर २०२३ रोजी घोषणा केली होती. त्यामध्ये प्रकल्प व्यवस्थापन, वित्तीय विश्लेषण, तंत्रज्ञानावर आधारित वित्तीय कंपन्या (फिनटेक), आंतरराष्ट्रीय लेखापद्धती या गोष्टींचा समावेश आहे. तर विद्यापीठाने केपीएमजी, प्राईमेस अशा नामवंत कंसल्टींग कंपन्यांशीही करार केला आहे. त्या माध्यमातून विद्यापीठातील ‘एमबीए एनालेटेक्स’च्या विद्यार्थ्यांना कामावर असतानाच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हेही वाचा : मुंबईत प्रदूषण वाढलं, कृत्रिम पाऊस पाडणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आवश्यक…”
‘कौशल्य आणि उद्योजकीय आकांक्षा निर्माण करणे आवश्यक आहे आणि या बदलासाठी प्राध्यापकांची क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. आम्ही अनेक महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप आणि प्री-इन्क्युबेशन केंद्रांच्या स्थापनेद्वारे शैक्षणिक संस्थामध्ये कौशल्ये निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत’, असे मत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांनी व्यक्त केले.