मुंबई : स्वातंत्र्यदिनी मुंबईसह राज्यातील अॅप आधारित टॅक्सी आणि रिक्षा सेवांना फटका बसण्याची शक्यता आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनेक अॅप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालक राजव्यापी निदर्शने आंदोलन करणार आहेत. १५ ऑगस्ट रोजी ‘ना वाहन दिवस’ पाळण्यात येणार असून उबर, रॅपिडो अॅपचे चालक एक दिवसीय सामुदायिक सुट्टीवर जाणार आहेत. त्यामुळे १५ ऑगस्टला अॅप टॅक्सी आरक्षित करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे.
आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने
हे आंदोलन महाराष्ट्र कामगार सभेच्या नेतृत्वात केले जाणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह प्रमुख शहरांमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) एक दिवस शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. हे आंदोलन १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. यादरम्यान सहभागी होणारे चालक टॅक्सी, रिक्षा चालविणार नाहीत.
अॅग्रीगेटर कंपन्यांकडून होणाऱ्या शोषणाविरोधात निदर्शने
अॅप आधारित टॅक्सी, रिक्षा चालकांची संबंधित अॅग्रीगेटर कंपन्यांकडून कायम पिळवणूक केली गेली. त्यांना प्रति किमी ८ ते १२ रुपये प्रमाणे भाडे देण्यात आले. आरटीओने निश्चित केलेल्या दरानुसार अॅग्रीगेटर कंपन्यांनी द्यावेत, यासाठी चालकांचा संघर्ष सुरू आहे. अॅग्रीगेटर कंपन्यांकडून होणाऱ्या शोषणाविरोधात १५ ऑगस्ट रोजी अॅप आधारित टॅक्सी, रिक्षा चालक निदर्शने करणार आहे.
भारतीय चालक एकता दिन साजरा केला जाणार
देशभरातील सर्व चालकवर्ग अॅग्रीगेटर कंपन्यांच्या शोषणाविरोधात स्वातंत्र्य दिनी भारतीय चालक एकता दिन साजरा करणार आहे. तसेच आरटीओ कार्यालयासमोर सकाळी ९ वाजता राष्ट्रध्वज फडकविणार आहेत. यादिवशी सर्व अॅप आधारित टॅक्सी, रिक्षा चालक सामुदायिक सुट्टी घेऊन, ‘ना वाहन दिवस’ पाळतील, असे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.
चालकांचे म्हणणे काय
घटते उत्पन्न, वाढत्या खर्चामुळे जगणे कठीण झाले आहे. अॅग्रीगेटर कंपन्यांकडून हक्काचे पैसे मिळत नसल्याने, कर्जाचे हप्ते, वाहन देखभाल खर्च, इंधन खर्च व इतर मूलभूत आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास असमर्थ आहेत, असे म्हणणे चालकांनी व्यक्त केले. त्यात कंपन्या मनमानी कारभार करत दंड आकारतात. त्यामुळे दंड भरण्यात बरेच पैसे जातात, असे मत चालकांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनी निदर्शने करून अॅग्रीगेटर कंपन्यांसह राज्य सरकारला चालकांची एकता दाखवली जाईल. तसेच राज्य सरकारकडे चालकांच्या मागण्या मांडल्या जातील. जोपर्यंत मागण्यावर योग्य तोडगा काढला जाणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका चालकांनी मांडली.