४४ स्टार्टअप्स युनिकॉर्नपैकी राज्यातील अकरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : देशातील नवउद्यमींमध्ये (स्टार्ट अप्स इकोसिस्टीम) महाराष्ट्र अव्वल स्थानावर असून ११ हजार ३०८ नवउद्योमीसह देशभरात २०२१-२२ आर्थिक वर्षात सुरू झालेल्या ४४ स्टार्टअप्स युनिकॉर्नपैकी ११ युनिकॉर्न महाराष्ट्रातील आहेत.

केंद्र सरकारने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात याची नोंद असल्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

सुमारे ७ हजार ५०० कोटी ते ७५ हजार कोटी रुपये मूल्यांकन असलेल्या कंपनीला युनिकॉर्न म्हणून ओळखली जाते. देशभरातील २५ टक्के युनिकॉर्न महाराष्ट्रातील आहेत, ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यातील कल्पक तरुणांनी या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे, असे मलिक यांनी सांगितले.

मलिक म्हणाले की, राज्यात ३२ हजार ६६२ इतके नोंदणीकृत नवउद्योमी आहेत. त्यापैकी ११ हजार ७०५ हे मान्यताप्राप्त आहेत. देशात सुमारे ६२ हजार मान्यताप्राप्त नवउद्योमी आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान ५ ते ७ मान्यताप्राप्त नवउद्योमी आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये ३० नोंदणीकृत आणि ९ मान्यताप्राप्त तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये ३२ नोंदणीकृत आणि ११ मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. मुंबई महानगर प्रदेशात १४ हजार ७१० नोंदणीकृत तर ५ हजार ९३८ मान्यताप्राप्त नवउद्योमी आहेत.

राज्य शासनाने नावीन्यपूर्ण नवउद्योमी धोरण जाहीर केले आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी कार्यरत आहे. धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या सोसायटीमार्फत विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या धोरणांतर्गत स्टार्टअप वीक, इनक्युबेटर्सची स्थापना, चॅलेंज, हॅकेथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसाहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) अर्थसाहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर, हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडित विविध प्रकारचे साहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे, असे मलिक यांनी नमूद केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra tops among new entrepreneurs eleven of the 44 startups unicorn in the state akp
First published on: 04-02-2022 at 01:29 IST