मुंबई : मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊन उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात शुक्रवारी विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.
सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. मात्र, पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. उत्तर प्रदेश आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली मध्य प्रदेशकडे सरकत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील बिकानेरपासून दातीया, तीव्र कमी दाबाचे केंद्र, देहरी, पुरुलिया, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
कोकणात जोरदार सरी
कोकण आणि घाट परिसरात गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मराठवाड्यात काही भागात अतिवृष्टी झाली. तर परभणीतील सेलू येथे राज्यातील उच्चांकी १३० मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भात मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे या भागात सध्या उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. चंद्रपूर येथे गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. याचबरोबर सोलापूर, जेऊर, धुळे या भागातही ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आज पावसाचा अंदाज कुठे?
सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, दक्षिण मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अकोला, अमरावती या जिल्ह्यांत शुक्रवारी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित भागात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शनिवार, रविवारी पावसाची उघडीप
विदर्भात शनिवारी आणि रविवारी पावसाची उघडीप राहील. राज्यात काही ठिकाणी रविवारी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर इतर भागात पाऊस उघडीप देईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईत पावसाची स्थिती काय?
सध्या मुंबईत अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नाही. पुढील आठवड्यात काही प्रमाणात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.