मुंबई : महारेराने काही महिन्यांपूर्वीच आपल्या संकेतस्थळात बदल, सुधारणा करून ते कार्यान्वित केले. आता या संकेतस्थळावरील नवीन ॲप्लिकेशन पोर्टल ५ मेपासून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवीन ॲप्लिकेशन पोर्टस सुरू झाल्यास गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी, प्रकल्पास मुदतवाढ आणि प्रकल्पात, प्रकल्पाच्या माहितीत काही दुरुस्ती करणे आता अधिक सोपे होणार आहे. त्याचवेळी ज्या विकासकांनी सध्याच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे वा मुदतवाढ मागितली आहे वा काही दुरुस्तीसाठी अर्ज केला आहे, त्यांची पुढील प्रक्रिया मात्र जुन्या ॲप्लिकेशन पोर्टलद्वारेच पूर्ण होणार आहे. त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही, असे महारेराने स्पष्ट केले आहे.
राज्यात महारेराच्या माध्यमातून २०१७ पासून रेरा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. स्थापनेच्या वेळी महारेराने आपले संकेतस्थळ तयार करून ते कार्यान्वित केले. मात्र आता या संकेतस्थळात काळानुरूप, काळाशी सुसंगत आमूलाग्र बदल करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेता महारेराने नवीन संकेतस्थळ बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नवीन संकेतस्थळ तयार केले. हे संकेतस्थळ तयार करताना ते वापरकर्तास्नेही असेल आणि ग्राहकांना उपयुक्त ठरतील अशा अनेक घटकांवर यात भर दिला. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी नवीन संकेतस्थळ सुरू झाले. आता या नवीन संकेतस्थळावरील महत्त्वाचे असे नवीन ॲप्लिकेशन पोर्टल तयार केले असून हे नवीन ॲप्लिकेशन पोर्टल ५ मेपासून कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन ॲप्लिकेशन पोर्टलद्वारे आता नवीन गृहप्रकल्पाची नोंदणी करणे विकासकांना अधिक सोपे होणार आहे. तर प्रकल्पासाठी मुदतवाढ घेणे वा प्रकल्पात, प्रकल्पातील माहितीत काही दुरुस्ती करणेही विकासकांना अधिक सोपे होणार आहे. दरम्यान विकासक, प्रवर्तक यांच्यासाठीच्या ॲप्लिकेशन पोर्टलमध्ये बदल करून नवीन पोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे.
ग्राहक आणि दलालांसाठीच्या यंत्रणेसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे सध्याच्या पोर्टलमध्ये ज्या विकासकांनी नोंदणी अर्ज केला असेल वा मुदतवाढीसाठी अर्ज केला असले त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. वा दुरूस्तीसाठी अर्ज केलेल्यांना नवीन पोर्टलमध्ये अर्ज करण्याची गरज नसल्याचे महारेराकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्याच्या पोर्टलवरून प्राप्त झालेल्या अर्जांसंबंधीची पुढील कार्यवाही सध्याच्या पोर्टलवरून होणार आहे. मात्र ५ मेपासून नव्याने नोंदणी अर्ज, मुदतवाढ अर्ज आणि दुरुस्ती अर्ज नवीन ॲप्लिकेशन पोर्टलवरून करता येणार आहे. महारेराकडे विविध परवानग्यांसाठी येणाऱ्या विकासकांची, प्रवर्तकांची महारेराच्या संकेतस्थळावरील स्वतःबद्दलची सविस्तर माहिती अचूक असायला हवी. नवीन संकेतस्थळाच्या दृष्टीने या सर्वांनी आणि भविष्यात या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या प्रवर्तकांनी ही माहिती अद्ययावत करायला, नवीन निर्माण करायला सुरुवात करावी यासाठी महारेरा कुठलेही शुल्क आकारणार नाही, असे महारेराने स्पष्ट केले आहे.