मुंबई: विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. याविषयीत राज्य निवडणूक आयोग आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने महाविकास आघाडी व मनसे पक्षाच्या वतीने येत्या शनिवारी मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या परवानगीसाठी शिवसेना (ठाकरे), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यासह सहभागी पक्षाच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. मतचोरीविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यासाठी ‘सत्याचा मोर्चा’ निघणार असला तरी त्यामुळे मुंबईकरांना कोणताही त्रास होणार नाही. दुपारी २ ते ४ या वेळेतच मोर्चा निघेल, अशी हमी पोलीस आयुक्तांना देण्यात आली.
मतचोरीविरोधात मनसे व महाविकास आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या परवानगीसाठी पोेलीस आयुक्त देवेन भारती व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर याविषयीच माहिती ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी दिली. मतदार याद्यांमधील घोळाबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने शनिवारी सत्याचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या नियोजनाबाबत व परवानगीसाठी मुंबई पोलीस आयुक्त तसेच अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटीत सकारात्मक चर्चा झाली. मेट्रो सिनेमापासून मोर्चाला सुरुवात होईल आणि महापालिका मुख्यालयासमोर मोर्चा थांबेल. या ठिकाणी प्रमुख नेत्यांची भाषणे होतील, अशी माहिती खासदार सावंत यांनी दिली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल परब, काँग्रेस नेते सचिन सावंत आणि प्रकाश रेड्डी आदी नेते उपस्थित होते.
सायंकाळी ४ आधी मोर्चा संपेल
मोर्चाकरिता साधारणत: दुपारी एक वाजता लोक जमतील. दोन वाजण्याच्या दरम्यान मोर्चाला सुरुवात होईल. दोन अडीच तासांमध्ये मोर्चा संपेल. आम्ही चारच्या आतमध्ये मोर्चा संपविणार आहोत. आमच्या मोर्चामुळे मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतली आहे, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. मोर्चात मोठ्या प्रमाणात कामगारदेखील सामील होतील. विरोधकांचे विविध पक्षातील नेते आणि कामगार वर्गदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी होईल, असे कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.
