मुंबई : राज्यातील मतदार याद्या सदोष आहेत. या मतदार याद्यांमध्ये लाखो दुबार नावे आहेत. मतदार याद्यांमधील दोष आयोगाने स्वताःहून दूर करावेत अथवा राजकीय पक्षांना मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक महिन्याचा वेळ द्यावा. कोणत्याही परिस्थितीत सदोष मतदार याद्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी एकमुखी मागणी महाआघाडीसह राज ठाकरे यांनी केली.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची संयुक्तपणे महाआघाडीच्या नेत्यांसह राज ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नेत्यांनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली.
लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र
लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहे. भाजपला निमंत्रण देऊन ही भाजप आमच्या सोबत आला नाही. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मतदार यांद्यामध्ये घोळ केला आहे. त्यांना हवे त्याचे नाव यादीत घालतात आणि नको त्याचे नाव काढून टाकतात. हा लोकशाहीचा खेळखंडोबा आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना काहीही अधिकार नाहीत, ते फक्त कठपुतळी बहुल्या आहेत. कोणतेही प्रश्न विचारले तरी निवडणूक आयोगातील अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतात.
मतदार यादीतून मतदारांची नावे वगळल्या प्रकरणी सदोष मत वधाचा गुन्हा आयोगावर दाखल करावा. मतदार याद्यांमधील घोळाची जबाबदारी नेमकी कुणाची. आता सर्वोच्च न्यायालयाने मतदार याद्यांमधील घोळाची दखल घ्यावी. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही चालू देणार नाही. आमच्या मागण्यांवर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे आमचे लक्ष आहे. त्यानंतर आम्ही भूमिका स्पष्ट करू, असे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
कोण कोणाचे वडील ?
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कांदिवली मधील मतदार यादीतील मतदार आणि त्यांच्या वडिलांचे वय यातील तफावत दाखवली. मतदारांचे वय आणि त्यांच्या वडिलांच्या वयातील तफावत पाहता कोण कोणाचे वडील आहेत, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मतदार यादी दाखवत नाही, इथेच मोठा घोळ आहे. मतदार यादीत मतदारांचा फोटो नाही, पत्ता नाही, घर क्रमांक नाही, अशी मतदार यादी कशी असू शकते. आणखी सहा महिने घ्या, पण, मतदार यादी दुरुस्त करूनच निवडणुका घ्या. मतदार यादीत दुरुस्तीसाठी राजकीय पक्षांना फक्त आठ दिवसांचा वेळ का, असा प्रश्नही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
परराज्यांतील विद्यार्थीही मतदार
महाविद्यालयात बाहेरील राज्यातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी मतदार कसे झाले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत असलेल्या घोळांबाबत तक्रार करून देखील कारवाई झाली नाही. देशपातळीवर राहुल गांधी यांनी हाच मुद्दा मांडला आहे. पण, निवडणूक आयोग जबाबदारी झटकत आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे निष्पक्ष निवडणुका होत नाहीत, हा लोकशाहीला मोठा धोका असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाचे काम भाजपचे पदाधिकारी असलेला देवांग दवे हा काम करीत होता, त्याला कंत्राट मिळाले होते, असा आरोपही त्यांनी केला.
एकाच घरात शेकडो मतदार कसे ?
मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत. काही मतदार नोंद असलेल्या पत्त्यावर राहत नाहीत. घर क्रमांक चुकीचे आहेत. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवले गेले आहेत. नाशिकमध्ये एकाच घरात ८१३ मतदार आहेत. नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता या महिलेचे नाव सहा वेळ वेगवेगळ्या मतदार ओळखपत्र क्रमाकांसह (एपिक नंबर)नोंदविल्याचे वृत्त १२ ऑगस्ट २०२४ रोजी विविध वृत्त वाहिन्यांनी पुराव्यासह प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सायंकाळी ते नाव हटविले गेले. हे नाव कोणी हटवले ? हे नाव हटवण्याची तक्रार कोणी केली होती, असा प्रश्न जयंत पाटील यांनी आयोगाला विचारला.
राज्य किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (सर्व्हर) महाराष्ट्रात त्रयस्त व्यक्ती चालवतो. नुकतेच शिंदे गटाच्या एका आमदाराने जाहीरपणे २० हजार मतदार बाहेरून आणले, त्यामुळे विजय झाला, असे वक्तव्य केले होते. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत सोयीनुसार बदल होत असल्याची तक्रार निवडणुकीच्या एक महिना अगोदर आयोगाकडे केली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. ही लोकशाहीची थट्टा आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या सर्व प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन नि