मुंबई : भाजपमध्ये सामील व्हा, अन्यथा तुरुंगात जावे लागेल, अशी परिस्थिती सध्या देशभरात आहे, असे टीकास्त्र सोडत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालय हे आता आमच्यासाठी आशेचा किरण असल्याचे स्पष्ट केले.  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच महाविकास आघाडीकडून शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात सभा घेण्यात येणार आहेत.

 पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला होणार आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला  महाविकास आघाडीच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बुधवारी पार पडलेल्या बैठकीला ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

या वेळी ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखविली. देश अशा परिस्थितीतून जात असतानाही पुन्हा दाखविली जाईल आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल, असे ठाकरे यांनी नमूद केले.  शिवसेनेतून फुटून निघालेल्या आमदारांना का थांबविले नाही, असे मला विचारले जाते. पण विकल्या गेलेल्या आमदारांना बरोबर घ्यायचे नव्हते. त्यामुळे जाणाऱ्यांसाठी दारे उघडी होती, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपची सत्तेवरून हकालपट्टी करण्याची सुरुवात महाराष्ट्रातून करू, असे पटोले यांनी सांगितले.

‘पंचामृत दिल्याने पोट भरत नाही’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई : यंदा अर्थसंकल्पास सरकारने ‘पंचामृत’ असे गोड नाव दिले असले तरी ते पळीभर दिले जाते, त्याने कोणाचेही पोट भरत नाही. तुमच्या हातावर पडेल तितके घ्या, उरलेले डोक्यावरून फिरवा, अशी खोचक टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.