मुंबई : लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम दोन दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे आणि नाशिकच्या जागांसाठी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा बुधवारी करण्यात आली. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेला गुंता आता सुटला असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १५ जागा पदरात पाडून सरशी साधल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या वाटयाला २८ तर,  राष्ट्रवादी अजित पवार गट चार आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाटयाला एक असे जागावाटप झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील अर्ज दाखल करण्याची शुक्रवापर्यंत मुदत असली तरी महायुतीतील सहा जागांचा तिढा सुटला नव्हता. अखेर गेल्या दोन दिवसांत पालघरचा अपवाद वगळता अन्य मतदारसंघांचा प्रश्न सुटला आहे. त्यापैकी ठाणे मतदारसंघातून शिंदेंचे निष्ठावंत नरेश म्हस्के यांना तर, नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची मंगळवारी घोषणा करण्यात आली.

लोकसभेचे तीन उमेदवार बदलण्यास भाग पाडल्याने भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करणार, असे चित्र निर्माण झाले असताना शिंदे यांनी १५ जागा पदरात पाडून स्वत:चे महत्त्व कायम ठेवले आहे. शिवसेनेचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठीच भाजपने शिंदे यांना झुकते माप दिल्याचे सांगण्यात येते. ठाणे आणि नाशिक हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे होते. नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी, अशी सूचना भाजपच्या दिल्लीतील वर्तुळातून करण्यात आली होती. यानुसार भुजबळांनी तयारी सुरू केली होती. पण नाशिकची जागा सोडण्यास शिंदे यांनी ठाम नकार दिला होता. शेवटी वैतागून भुजबळांनी माघार घेतली होती. आपली उमेदवारी जाहीर व्हावी म्हणून गेली महिनाभर खासदार हेमंत गोडसे हे नाशिक, मुंबई, ठाणे अशा फेऱ्या मारत होते. अखेर हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

हेही वाचा >>> चावडी : किती नामुष्की?

महाराष्ट्रात भाजपची ३० ते ३२ जागा लढविण्याची योजना होती. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी ताणून धरल्याने भाजपचाही नाईलाज झाला. जागावाटपात भाजप २८, शिंदे गट १५, राष्ट्रवादीतील अजित पवार गट ४ तर राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली आहे. भाजपला तीन ते चार जागांवर समझोता करावा लागला. अजित पवार गटाचा सध्या एकच खासदार होता. पक्षाने आठ ते नऊ जागांची मागणी केली होती. पण चारच जागा राष्ट्रवादीच्या वाटयाला आल्या आहेत. यापैकी शिरूर आणि धाराशिवमध्ये शिंदे सेना आणि भाजपकडून उमेदवार आयात करावे लागले आहेत. यामुळे सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार हे दोनच मूळ पक्षाचे उमेदवार आहेत.

कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली. डॉ. शिंदे यांनी यापूर्वीच प्रचार सुरू केला होता.  महायुतीला मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे निवडणुकीच्या रिंगणात नसला तरी राज ठाकरे यांनी मुंबई, ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाला शह देण्यासाठी प्रचारात उतरावे, असे महायुतीकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

पालघर भाजपच्या वाटयाला?

भाजपच्या वाटयाला २८ जागा  पालघरमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार असले तरी ही जागा भाजपच्या वाटयाला जाणार आहे. पालघरवर आमचा हक्क असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असला तरी हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची शिंदे यांची तयारी झाली आहे.

शिंदे यांना झुकते माप

शिंदे यांना कमी जागा सोडल्या असत्या तर उद्धव ठाकरे यांना टीका करण्याची संधी मिळाली असती. तसेच शिंदे गटाचे कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटात जाण्याची भीती होती. शिंदे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व कायम राखण्याकरिताच भाजपने दोन पावले मागे घेतल्याचे सांगण्यात येते. राज्यातील भाजपचे नेते शिंदे यांना अधिक जागा सोडण्यास राजी नव्हते. पण दिल्लीच्या पातळीवर शिंदे यांना झुकते माप देण्यात आल्याचे समजते.  शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा विश्वास संपादन केल्यानेच त्यांच्या कलाने दिल्लीने घेतले आहे. आता १५ पैकी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे शिंदे यांच्यासमोर आव्हान असेल.

जागावाटप

महायुती                    महाविकास आघाडी

भाजप  २८                  काँग्रेस  १७

शिवसेना (शिंदे गट)    १५     शिवसेना (ठाकरे गट)   २१

राष्ट्रवादी (अजित पवार गट)    ४      राष्ट्रवादी (शरद पवार गट) १०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय समाज पक्ष     १