महाराष्ट्र परिवहन आयुक्त महेश झगडे यांची गुरुवारी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सीईओपदी बदली करण्यात आली. केवळ आठच महिन्यात झगडे यांची परिवहन आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सामान्य नागरिकांची लुबाडणूक थांबविण्याच्या उद्देशाने परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी आरटीओ कार्यालयातून एजंटांना हद्दपार करण्याचे आदेश काढले होते. त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, एजंटांनी या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एजंट हटाव मोहिमेमुळेच झगडे यांची बदली करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाचे काम एक मे पासून सुरू झाले आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. या प्राधिकरणाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून झगडे काम सांभाळणार आहेत.