मुंबई : मुंबईत आग लागण्याचे सत्र सुरूच असून मालाड (पश्चिम) येथील लिंक रोडवरील ‘फोर डायमेंशन’ या इमारतीत गुरुवारी मध्यरात्री आग लागली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सुमारे १५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या कॉल सेंटर युनिटमध्ये लागली होती.
गुरुवारी मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास ही आग लागली. क्षणातच आगीचा भडका उडाल्यामुळे मुंबई अग्निशमन दलाने दोन क्रमांकाची वर्दी दिली. पाचव्या मजल्यावर सुमारे १५ हजार चौरस फूट क्षेत्रफळात कॉल सेंटर युनिटमधील विद्युत वाहिन्या, विद्युत यंत्रणा, लाकडी फर्निचर, पार्टिशन, फॉल्स सीलिंग, संगणक व सर्व्हर रूममधील साहित्य जळून खाक झाले. आगीमुळे इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले होते.
त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडथळे येत होते. अखेर काचेची तावदाने फोडण्यात आली. त्यामुळे इमारतीमधील धूर बाहेर पडला. अग्निशमन दलाच्या सात अग्निशामक गाड्या, रुग्णवाहिका, पाण्याचे ट्रँकर, तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग नियंत्रणात आणून पूर्णतः विझवण्यात आली असून, शुक्रवारी सकाळी ९ वाजता ही आग विझल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
