मुंबई : मालवणी पोलिसांनी बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली असून या टोळीकडून सुमारे साडेआठ लाखांच्या बनावट नोटा आणि नोटा बनिवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. या नोटा कुठे बनवण्यात येतात आणि या टोळीचा सूत्रधार कोण त्याचा तपास पोलीस करीत आहेत.
मालाड (प.) येथील मार्वे परिसरात काही इसम बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता. मार्वे समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यावर गुरूवारी रात्री ९ च्या सुमारास एक निळ्या रंगाची गाडी आढळली. पोलिसांनी गाडी अडवली आणि गाडीतील संशयित इसमांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता गाडीत ५०० रुपयांच्या १ हजार ७४० बनावट नोटा, तसेच नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य सापडले. या कारवाईत एकूण साडेआठ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी संपत एंजपल्ली (४६) आणि रहिमपाशा शेख (३०) या दोघांना अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपी मुळचे तेलंगणामधील आहेत. आरोपींविरोधात कलम १७८, १८०, १८१, १८२, ३१८ (१), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्याची शक्यता आहे. या टोळीच्या सूत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलैंद्र नगरकर, पोलीस निरीक्षक जीवन भातुकले (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे, तसेच तपासणी पथकातील अनिल पाटील, जगदीश घोसाळकर, सुशांत पाटील, सचिन वळतकर, मुद्दसिर देसाई, समित सोरटे, कालिदास खुडे आदींनी ही कारवाई केली.