मुंबई: मानखुर्द परिसरात मनी ट्रान्सफरचा व्यवसाय करणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाने महिन्याभरापूर्वी आर्थिक फसवणुकीला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली होती. मृत्युपूर्वी त्याने संगणकावर एक पत्र लिहिले होते. यावरून मानखुर्द पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या चौघांविरोधात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मानखुर्दमधील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात कुटुंबियासह वास्तव्यास असलेल्या तोहीद खानचा (२९) मनी ट्रान्सफरचा व्यवसाय होता. त्याने काही दिवसांपूर्वी एक दुकान भाड्याने घेतले होते. यासाठी त्याने साडेआठ लाख रुपये दिले होते. मात्र पैसे दिल्यानंतरही मालकाने त्याला अनेक महिने दुकानाचा ताबा दिला नव्हता. शिवाय तो पैसेही परत देत नव्हता. त्यामुळे तोहीद प्रचंड तणावात होता.
याचदरम्यान एका मैत्रिणीने त्याला एक ऑनलाइन लिंक पाठवून त्याच्या बँक खात्यातून ४२ हजार रुपये लंपास केले होते. बँकेने त्याला सूचना न देता त्याचे खाते बंद केले होते. यामध्ये त्याचे ३१ हजार रुपये होते. या सर्व आर्थिक फसवणुकीला कंटाळून तोहीदने ७ जून रोजी घरात आत्महत्या केली. मात्र घटनेनंतर २० दिवसानी त्याच्या संगणकामध्ये त्याच्या भावाला एक चिठ्ठी सापडली. यामध्ये फसवणूक करणाऱ्याना कडक शिक्षा करावी, असे त्याने चिठ्ठीत लिहिले होते.
तोहीदच्या भावाने ही चिठ्ठी पोलिसांना दिली. मानखुर्द पोलिसांनी मंगळवारी रात्री दुकान मालक, त्याची पत्नी, बँक कर्मचारी आणि मैत्रीण आशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.