छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्पातील मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावरील छेडा नगर जंक्शन परिसरातील १,२३५ मीटरच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारी रात्री या उड्डाणपुलातील शेवटचा गर्डर (तुळई) बसविण्यात आला. आता उर्वरित कामे पूर्ण करून हा पूल १५ फेब्रुवारीपासून वाहतूक सेवेत दाखल करण्याची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरु केली आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास छेडा नगर येथील अत्यंत गंभीर अशी वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे. तर मानखुर्द – ठाणे प्रवासातील ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी कमी होऊ शकेल.

हेही वाचा- मुंबई विमानतळ ते दक्षिण मुंबई, ठाण्यासाठीही प्रिमियम बस सेवा; बेस्ट उपक्रमाकडून नवीन मार्गाची चाचपणी

पूर्वमुक्त मार्गावरून सुसाट येणाऱ्या वाहनांना छेडा नगर जंक्शन येथे वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यामुळे एमएमआरडीएने छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत छेडा नगर येथे तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिला तीन मार्गिकेचा पूल ६८० मीटर लांबीचा असून तो शीव आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. दुसरा दोन मार्गिकेचा १,२३५ मीटर लांबीचा उड्डाणपूल मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे.

तिसरा ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्त्याला जोडण्यात आला आहे. यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. यापैकी ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल मार्च २०२२ मध्ये वाहतुकीस खुला झाला आहे. सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पास हा उड्डाणपूल जोडण्यात आला असून हा पूल खुला झाल्याने छेडा नगर परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होत आहे. छेडा नगर उड्डाणपुलासह ५१८ मीटर लांबीच्या आणि ३७.५ मीटर रुंदीच्या सब-वेचा पहिला टप्पाही पूर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> ठाणे-बोरिवली प्रवास केवळ २० मिनिटांत, भूमीगत मार्गाच्या बांधकामासाठी निविदा जारी; पावसाळ्यात कामाला सुरुवात

आता मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील १,२३५ मीटरच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारी कामातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. या उड्डाणपुलातील शेवटचे दोन गर्डर बसविण्याचे काम शिल्लक होते. सोमवारी सकाळी यापैकी एक गर्डर बसविण्यात आला आहे. तर सोमवारी रात्री दुसरा गर्डर बसविण्यात आला. एकूणच आता काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून हा पूल वाहतूक सेवेत दाखल होऊ शकेल अशी माहिती एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> टिटवाळा रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल जूनमध्ये खुला?, पुलाच्या पोहच रस्ते कामांना प्रारंभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वमुक्त मार्गावरून सुसाट आल्यास ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना छेडा नगर जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी अडकावे लागत आहे. या वाहतूक कोंडीत ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी वाया जातो. पण आता मात्र छेडा नगर येथील १,२३५ मीटर लांबीचा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास हा वेळ वाचणार आहे. हा पूल केवळ पाच मिनिटात पार करत पुढे ठाण्याला जाणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.