मुंबई : ‘मुंबई आपलीच आहे, फिरून घ्या,’ असे म्हणत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांनी रविवारचे औचित्य साधत मुंबई पर्यटन केले. रविवारी आझाद मैदानावर गर्दी कमी होती. पण, शहरातील चौपाट्या, नरिमन पाईंट, मरीन ड्राइव्ह, जुहू येथील इस्कॉन मंदिर, हाजी आली दर्गा, महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, गेटवे ऑफ इंडिया आदी ठिकाणांवर आंदोलकांचे जथ्थे दिसून आले. हलकी आणि झांज वाजवत, नाचत आंदोलकांनी मुंबई पाहण्याचा आनंद लुटला.
गत तीन दिवसांपासून आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस असल्यामुळे आंदोलकांनी मैदान, सीएसटी आणि मुंबई महापालिकेसमोरील चौकात ठिय्या मारला होता. रविवारी पावसाने उघडीप दिली होती. तसेच मैदानावर फारशा सुविधा नसल्यामुळे सर्वजण आझाद मैदानावर थांबू नका. गाड्या पार्किंग केलेल्या ठिकाणी जा. मुंबई फिरून पहा, असे खुद्द जरांगे यांनीच सांगितल्यामुळे आंदोलकांनी रविवारचे औचित्य साधत मुंबई पर्यटन केले.
रविवारी आझाद मैदानावर गर्दी नव्हती. आंदोलकांनी शहरातील चौपाट्या, नरिमन पाईंट, मरीन ड्राइव्ह, जुहू येथील इस्कॉन मंदिर, हाजी आली दर्गा, महालक्ष्मी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, गेटवे ऑफ इंडिया आदी ठिकाणांवर आंदोलकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. हलकी आणि झांज वाजवत, नाचत आंदोलकांनी मुंबई पाहण्याचा आनंद लुटला.
विशेष म्हणजे आझाद मैदानासह ज्या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत, त्या सर्व ठिकाणी आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. दिवसभर गावाकडून टेम्पोतून आलेल्या भाकरी, ठेचा, लोणंचे, चटण्यांचे वाटप करण्यात येत होते. त्यामुळे मुंबईभर विखुरलेल्या मराठा आंदोलकांचे रविवारी जेवणाचे हाल झाले नाहीत. चटणी, लोणंचे भाकरीसह फरसणा, बिस्किटांची पाकिटे वाटण्यात आली.
मराठा आंदोलकांच्या समाज माध्यमांवर आझाद मैदानातून पर्यटन ठिकाणी कसे जाता येईल. त्यासाठी किती पैसे लागतील. या माहितीसह गुगल नकाशे आंदोलकांच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आले होते. त्यामुळे रविवारी आंदोलकांनी रविवारी मुंबई पर्यटन केले.
मुस्लिम समाजाकडून अन्नदान
आझाद मैदानासह दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाकडून अन्नदान करण्यात आले. आम्ही मराठा समाजासोबत आहोत. मानवता हीच खरा धर्म आहे, असा नारा देत मुस्लिम समाज हिरीरीने अन्नदान करताना दिसून आला. शुक्रवार, शनिवारी आंदोलकांचे जेवणासाठी हाल झाले. पण, रविवारी राज्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर जेवण, अन्न, खाण्या- पिण्याच्या साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले.