मुंबई: मराठा आरक्षणासाठी गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदान परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. आझाद मैदान आणि संपूर्ण परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुमारे ८०० स्वच्छता कर्मचारी नेमले आहेत.
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकांची कोणतीही सोय केलेली नसल्याच्या आरोपांचे मुंबई महापालिकेने आज पुन्हा एकदा खंडन केले आहे.
आझाद मैदान आणि संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येने लोक जमा झाल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साठत आहे. खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे, कागद, पाण्याच्या बाटल्या जिकडे तिकडे पडल्या असून त्या परिसराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने सुमारे ८०० स्वच्छता कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून अखंडपणे स्वच्छता राखली जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
कचऱ्याच्या पिशव्यांचे वितरण…
आंदोलकांना महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी थैल्या (डस्टबिन बॅग) मोठ्या संख्येने वितरित करण्यात येत आहेत. त्यातच आंदोलकांनी कचरा टाकून तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवावा, असेही आवाहन महापालिकेच्या वतीने केले जात आहे.
आंदोलकांची झोपण्याची, बसण्याची, खाण्यापिण्याची, शौचालयाची पुरेशी सोय नसल्यामुळे शनिवारी आंदोलक आक्रमक झाले होते. आंदोलकांनी पालिका मुख्यालयासमोर आंदोलकांनी चूल मांडली होती.
पाण्याचे २५ टँकर्स
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने एकूण २५ टँकर उपलब्ध करून दिले आहेत. आझाद मैदान, महापालिका मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, हुतात्मा स्मारक चौक, बॉम्बे जिमखाना, हज हाऊस, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, एअर इंडिया इमारत, त्याचप्रमाणे येलो गेट, फ्री वे वर शिवडी, कॉटन ग्रीन वाहन तळ, वाशी जकात नका या ठिकाणी या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
३०० पेक्षा अधिक प्रसाधनगृह
आझाद मैदान आणि परिसरात, नियमित आणि फिरते असे मिळून सुमारे ३०० पेक्षा अधिक शौचकूप असणारी प्रसाधनगृहांची व्यवस्था आंदोलकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. प्रसाधनगृहांचीही नियमितपणे स्वच्छता केली जात आहे.