Manoj Jarange Patil Protest End: मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आझाद मैदानावर एकच जल्लोष झाला. गुलालाची मुक्त उधळण करीत आंदोलकांनी आनंद साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांचा विजय असो, पाटील, पाटील, अशा घोषणा देत आंदोलकांनी जल्लोष केला.

राज्य मंत्रिमंडळाच्या उप समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य, शिंदे समितीचे सदस्यांच्या उपस्थितीत मागण्यांबाबतचे शासन निर्णय जरांगे यांनी स्विकारताच आझाद मैदानावर मोठा जल्लोष झाला. मागील अनुभवातून धडा घेत मनोज जरांगे यांनी आपल्या एक -एक मागण्यांबाबत विखे- पाटील यांच्याकडून खुलासा आणि मागण्यांच्या अंमलबजावणीची ग्वाही घेतली. एक – एक मागणी मान्य होताच आंदोलक प्रचंड घोषणा करीत होते.

आझाद मैदानावर प्रचंड घोषणाबाजी सुरू असतानाच बृह्न्मुंबई महापालिका चौक पुन्हा आंदोलकांनी काबीज केला. डीजेच्या तालावर मराठा आंदोलकांनी ठेका धरला होता. संपूर्ण चौकात आंदोलकांचा जल्लोष सुरू होता. अखेरीस राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती झाल्यानंतर आंदोलकांनी परतीचा प्रवास सुरू केला.