मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल होतच आहेत. बरसणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत अनेक आंदोलनकर्ते दक्षिण मुंबई स्वैरसंचार करीत होते. दरम्यान, आंदोलकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मुंबईतील ठिकठिकाणच्या खाऊ गल्ल्यांतील स्टॉल, फेरीवाल्यांनी आपापले ठेले बंद ठेवले होते.
दुकानदार, छोटी हॉटेल्सही बंद असल्यामुळे आंदोलकांना खाद्यपदार्थ मिळेनासे झाले आहेत. पोलिसच दुकाने, स्टॉल बंद ठेवून आपली गळचेपी करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते करीत आहेत. नरिमन पॉइंट परिसरातील फेरीवाल्यांनी दुकाने बंद ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दुपारी समुद्रकिनाऱ्यावरील रस्त्यावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.
आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली असून आंदोलकांनी आंदोलनस्थाळावरून हळूहळू काढता हाय घेण्यास सुरुवात केली आहे. बहुसंख्य आंदोलक नरिमन पॉइंट, गेट वे ऑफ इंडिया आणि आसपासच्या परिसरात फेरफटका मारत होते. मध्येच घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडत होते. दुपार झाल्यानंतर अनेकांनी खाद्यपदार्थांसाठी परिसरातील स्टॉल्स, ठेल्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र स्टॉल्स, हॉटेल्स बंद असल्यामुळे त्यांना खाद्यपदार्थ मिळू शकले नाहीत. काही ठिकाणच्या छोट्या हॉटेल्सवर आंदोलकांची झुंबड उडाली होती. परिस्थिती लक्षात घेऊन आणि पोलिसांच्या सूचनेनुसार सदर हॉटेलचालकांना हॉटेल बंद करावे लागले होते. त्यामुळे आंदोलकांच्या संतापात भर पडली.
पिण्याच्या पाण्याची बाटली ५० रुपयांना
पावसाच्या सरी अंगावर झेलत आंदोलक खाद्यपदार्थांचा शोध घेत फिरत होते. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची २० रुपयांची बाटली ४० ते ५० रुपयांना मिळत होती, असे काही आंदोलकांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यावरूनही आंदोलकांचा भडका उडत होता.
संतप्त आंदोलकांचा रास्ता रोको
खाद्यपदार्थ मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी अखेर नरिमन पॉइंट परिसरातील समुद्रालगतच्या सुभाष चंद्र बोस मार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रास्ता रोको आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. तर रास्ता रोको करून अडचणी वाढवू नये, अशी विनंती काही आंदोलक रास्ता रोको करणाऱ्यांना विनवणीच्या स्वरात सांगत होते. अखेर त्यांचे म्हणणे पटल्यामुळे रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला.
पोलिसांनी स्टॉल बंद केल्याचा आरोप
परिसरातील स्टॉल्स आणि फेरीवाल्यांचे ठेले पोलिसांनी जाणीवपूर्वक बंद केले आहेत. आम्हाला खाद्यपदार्थ, पाणी मिळू नये म्हणून हा खटाटोप घालण्यात आला आहे. आंदोलन चिरडण्याची ही सरकारची एक चाल आहे, असा आरोप काही आंदोलक करीत होते.
मंत्रालयासमोर घोषणाबाजी
पावसाची तमा न बाळगता काही आंदोलक मंत्रालयासमोर धडकले होते. आंदोलकांनी मंत्रालयासमोर सरकारविरोधी घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करीतच आंदोलक पुढे चौपाटीच्या दिशेला निघून गेले.