मुंबई : आयुष्याच्या प्रवासात स्वतःच्या जगण्याचा रस्ता शोधण्यासाठी अनेकजण अहोरात्र मेहनत करीत असतात. तसेच अनेकजण सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कसून काम करीत असतात. समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेसंदर्भात प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून मॉडेल आणि फॅशन कोरिओग्राफर रोहित पवार रूपेरी पडद्यावर पदार्पण करीत असून त्याने महत्वाची भूमिका साकारली आहे. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टपासून भेटीला येणाऱ्या ‘अवकारीका’ चित्रपटाचे दिग्दर्शन सीए. अरविंद भोसले यांनी केले असून अभिनेता विराट मडके याने स्वच्छता दूताची मुख्य भूमिका साकारली आहे.
आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल रोहित पवार म्हणाला की, ‘रेडबड मोशन पिक्चरसोबत माझे नाते खूप वर्षापासून आहे. माझ्या खडतर प्रवासात त्यांनी मला खूप आधार दिला. आर्थिक अडचणी आल्या, खूप अपमान सहन करावा लागला, पण माझे ध्येय मात्र अढळ राहिले. ‘अवकारीका’ माझ्यासाठी फक्त एक चित्रपट नाही, तर माझे स्वप्न आहे. मी माणूस म्हणून समाजासाठी काय देऊ शकतो, हा विचार मला ‘अवकारीका’ने दिला. या चित्रपटात मी गटार साफ करणाऱ्या स्वच्छतादूताची भूमिका केली आहे. या कामगारांना मी चित्रीकरणादरम्यान जवळून पाहिले, त्यांच्या डोळ्यातली हतबलता, वेदना, तरीही कामाप्रती असलेली निष्ठा हे सगळे पाहून मी भारावून गेलो.’
‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे. तर अभिनेता विराट मडके स्वच्छता दूताच्या भूमिकेत असून त्याच्यासोबत या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार आदी कलाकार मंडळी आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा, संवाद, गीते अरविंद भोसले यांची आहेत. तर श्रेयस देशपांडे यांचे संगीत असून गायक कैलाश खैर, सुनिधी चौहान, ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत.

मॉडेल, फॅशन कोरिओग्राफर आणि अभिनेता रोहित पवार
दरम्यान, ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. तर आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी स्वच्छतेचे महत्व पटवून देणाऱ्या आणि ‘अवकारीका’ चित्रपटासंदर्भात माहिती देणाऱ्या पथनाट्याचेही सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्यात भारुड व विविध गाण्यांचाही समावेश होता.