मुंबई : मराठी भाषेतील कथा आणि जपानमधील चित्रीकरण असा सुंदर योग ‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. भारत आणि जपान अशा दोन देशांमध्ये चित्रित होणाऱ्या या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोली ही जोडी पुन्हा नायक-नायिकेच्या भूमिकेत एकत्र दिसणार आहे.

‘तो, ती आणि फुजी’ या चित्रपटाची पटकथा लेखिका इरावती कर्णिक यांनी लिहिली असून ‘मीडियम स्पाईसी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणारा मराठी, हिंदी रंगभूमीवरचा प्रसिध्द दिग्दर्शक मोहित टाकळकर याने केले आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दोन प्रेमी, विवाहानंतर त्यांच्या नात्यात आलेली कटुता आणि एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर सात वर्षांनी जपानमध्ये झालेली दोघांची पुनर्भेट, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे.

मराठी कथा, कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रीकरण मात्र जपानमध्ये… हा योग या चित्रपटाचे निर्माते शिलादित्य बोरा यांच्यामुळे जुळून आला आहे. चाकोरीबध्द चित्रपटांपेक्षा वेगळे काही करू पाहणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये शिलादित्य बोरा यांचं नाव अग्रेसर आहे. ‘२०१९ मध्ये क्योटोमध्ये झालेल्या ‘फिल्ममेकर्स लॅब’मध्ये मी सहभागी झालो होतो. त्यावेळी जपानी भाषेत लघुपट करतांना मला तिथल्या निसर्गसौंदर्याने भुरळ घातली. त्याचवेळी भविष्यात जपानमध्ये घडणारी कथा चित्रपटात मांडायची असा निर्धार मी केला होता’, असे बोरा यांनी सांगितले. मोहित टाकळकरने जपानमध्ये घडणारी ही कथा शिलादित्य बोरा यांना ऐकवली आणि या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा बोरा यांनी तेलुगू अभिनेते राकेश वारे यांच्या मदतीने आपल्या खांद्यावर घेतली आहे. सध्या प्रादेशिक चित्रपटांना हिंदीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत असल्याने मराठीत चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचेही बोरा यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तो, ती आणि फुजी’ चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, कोलाड, टोकियो, क्योटो आणि माउंट फुजी इथे होणार आहे. दोन वेगवेगळ्या देशांत चित्रीकरण करण्यासाठी दोन वेगळया सिनेमॅटोग्राफर्सवर जबाबदारी देण्यात येणार असल्याचेही निर्मात्यांनी सांगितले. ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले याआधी ‘चि. व चिं. सौ. कां’ या चित्रपटात एकत्र आली होती. आता या जोडीचा हा मराठी-जपानी चित्रपट  १७ फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.