मुंबई : मंत्रालयाजवळील आमदार निवासामधील उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायरल चित्रफीतीच्या आधारे मरिन ड्राईव्ह पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीची मुद्दा सभागृहातही गाजला होता.
संजय गायकवाड यांच्याविरोधात कलम ११५ (२), ३५२, आणि ३(५), कलमाअंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिल्स स्पेशल पोलिसाच्या तक्रारीवरून गायकवाड यांच्यासह आणखी एका व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासात असलेल्या उपहारगृहातून गायकवाड यांनी मंगळवारी रात्री जेवण मागवले होते. त्यावेळी शिळा डाळ व भात देण्यात आला होता. डाळीतून दुर्गंधी येत होती, असा आरोप गायकवाड यांच्याकडून करण्यात आला होता.
आमदार संजय गायकवाड यांनी शिळे जेवण दिल्याबद्दल उपहारगृहातील कर्मचाऱ्याला विचारणा केली. मात्र उपहागृहातील कर्मचाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर गायकवाड यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली. तसेच त्याला बुक्के मारले. गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीची चित्रफीत वायरल झाल्याने ते चर्चेचा विषय ठरले. यापूर्वीही मी उपहारगृहातील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केल्याचे संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
आकाशवाणी आमदार निवासामधील उपहारगृहातील कर्मचाऱ्याला शिवसेनेच्या (शिंदे) आमदाराने मारहाण केल्याचा मुद्दा शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी बुधवारी विधान परिषदेत उपस्थित केला. कर्मचाऱ्यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्याला मारा. अशा लोकांचा तुम्ही पाठींबा देणार का, अशा आमदारांचे निलंबन करा, अशी मागणी अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी केली. या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असे वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली मिळाली असून भाजी खराब झाल्याचा वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे योग्य नाही.अशा मारहाणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापतींनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस विधान परिषदेत म्हणाले होते.