मुंबई : युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथून मुख्य आरोपीचे प्रत्यार्पण केल्यानंतर २५६ कोटी रुपये किमतीच्या मेफेड्रोनच्या (एमडी) निर्मितीसाठी रसायन पुरवणाऱ्याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.अटक आरोपीचे नाव ब्रिजेश आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.
याप्रकरणी मुख्य आरोपी मुस्तफा कुब्बावाला व ताहिर डोला यांना नुकतीच यूएईमधून प्रत्यार्पित करण्यात आले होते. ब्रिजेश आरोपींना रसायन पुरवठा करायचा. दोघेही आरोपी सांगलीमध्ये एमडी तयार करण्याचा कारखाना चालवत होते. या प्रकरणात ब्रिजेशला मंगळवारी मुंबईत आणण्यात आले असून त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष-७ च्या पोलिसांनी १५ फेब्रुवारी,२०२४ रोजी कुर्ला परिसरातून एका महिलेला ६४१ ग्रॅम एमडीजसह पकडले होते. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मिरा रोड येथे छापा टाकून तीन किलो एमडी जप्त केले होते. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे महिन्याभरानंतर सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावच्या शिवारात एमडी निर्माण करण्याच्या कारखानावर छापा टाकला होता. यावेळी १२६ किलो एमडी जप्त करण्यात आला होता. या कारवाईत ११ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी तिघांना गुजरातमधून अटक करण्यात आली होती.
परदेशात वास्तव्यास असतानाच ताहेर सलीम डोला व मुस्तफा कुब्बावाला हा कारखाना चालवत होते, असे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच शोध घेण्यात आला, आरोपी परदेशात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार इंटरपोलने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी ताहिर डोला व कुब्बावाला यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली. त्यानंतर अबुधाबी येथील नॅशनल सेंट्रल ब्युरो या यंत्रणेने त्यांना पकडले. मुंबई पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांच्यामार्फत यूएईकडे प्रत्यर्पणाची अधिकृत मागणी केली होती. पुढे दोघांनाही प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात आले.
१० दिवसांत ४०० कोटींच्या एमडीची निर्मिती
आरोपी ताहिर डोलाचे प्रत्यर्पण अमली पदार्थ विरोधी मोहिमेतील भारताचे मोठे यश मानले जाते. आरोपीचे वडील सलीम डोला हे देखील अंमली पदार्थ तस्करीच्या अनेक गुन्ह्यांत सहभागी होते. तसेच दाऊद टोळीशी संबंधित आहेत. ताहिर मोठ्या प्रमाणात एमडीची निर्मिती करीत होता. त्याच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या विविध कारखान्यांमध्ये १० दिवसांमध्ये २०० किलो एमडीची निर्मिती होत होती. दोन वर्षांपासून तो एमडी निर्मितीत सक्रिय होता. आरोपीविरोधात गुन्हे शाखेेने केलेल्या कारवाईत चार कोटी रुपये रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली होती.