मुंबई : धारावीतील शाळेत येत्या शुक्रवारी एका विशेष हत्तीणीचे आगमन होणार आहे. जिवंत हत्तीप्रमाणे दिसणाऱ्या ईली या यांत्रिक हत्तीणीचे या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्शन घडणार आहे. तिचा आवाजही ऐकता येणार आहे. ही हत्तीण एक रोबोट असली तरी जिवंत हत्तीप्रमाणेच तिचे बारीक डोळे, सतत हलणारे कान, सोंड, आणि स्पर्श केल्यानंतर थरथरणारी तिची त्वचा ही वैशिष्ट्ये आकर्षण ठरणार आहेत. अशी ॲनिमेट्रोनिक मेकॅनिकल हत्तीण धारावीतील मुलांना पाहता येणार आहे.

कोल्हापूरमधील महादेवी हत्तीणीची वनतारामध्ये पाठवणी झाल्यानंतर यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होती. मंदिरांमधील हत्तींच्या आरोग्याविषयी दोन्ही बाजूने चर्चा झाली. गेली अनेक वर्षे हत्तींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जनजागृती झाल्यानंतर सर्कशीतून आणि प्राणिसंग्रहालयातून हत्ती हद्दपार झाले. आता हत्ती फक्त जंगलातच दिसतात. धारावीतील दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना मात्र येत्या शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी हत्ती जवळून पाहता येणार आहे. त्याला हातही लावता येणार आहे.

धारावीतील या दोन शाळांमध्ये येणार हत्तीण

धारावीमधील दोन शाळांतील विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी अमेरिकेहून ईली नावाची हत्तीण येत्या ३ ऑक्टोबर रोजी येणार आहे. महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टच्या या दोन्ही शाळा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आणि छत्रपती शिवाजी राजे विद्यालय या दोन शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकांनी ईलीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार बाबुराव माने यांनी दिली.

महाकाय हत्तीण

ही हत्तीण म्हणजे खराखुरी जंगली हत्तीण नसून ती रोबोटिक किंवा यांत्रिक हत्तीण आहे. खऱ्याखुऱ्या हत्तीसारखीच महाकाय अशी ही हत्तीण आहे. तिची उंची ६.७ फूट आहे आणि रुंदी ४.७ फूट आहे. अमेरिकेत तयार करण्यात आलेली ईली नावाची हत्तीण सध्या आशिया खंडाच्या दौऱ्यावर आहे. सध्या ती भारतात आली असून भारतात तिला रोटरी क्लब आणि पेटा इंडिया या प्राणीमित्र संघटनेने प्रायोजित केले आहे. एका विशेष टेम्पोतून ही हत्तीण भारतात विविध ठिकाणी जाणार आहे.

हत्तीण साधणार संवाद

आपल्या विशेष भेटीमध्ये ही हत्तीण विद्यार्थ्यांशी अर्धा तास संवाद साधणार आहे. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना हत्तीणीला स्पर्शही करता येणार आहे. खऱ्या खुऱ्या हत्तीला स्पर्श केला की तो हत्तीची त्वचा जशी थरथरते तशीच या हत्तीणीचीही त्वचा लगेचच प्रतिसाद देते. तसेच ती सोंडही हलवते, सुपाएवढे कानही हलवते. सर्कस, उत्सव-धार्मिक सोहळे आणि ओझी वाहणे- फेऱ्या मारणे अशा कामांमध्ये खऱ्या हत्तीची मानवाकडून छळवणूक होते. विशेषत: खऱ्या हत्तींपासून मानवाने सुरक्षित अंतर ठेवून त्याचे कल्याण कसे करावेआणि खऱ्या हत्तीला वाईट वागणूक देऊ नये, त्याच्याशी गैरवर्तन करू नये ही शिकवण या ‘एलिफंट शो’मधून विद्यार्थ्यांना देणे हा या उपक्रमामागचा हेतू असल्याची माहिती पेटा इंडियाने दिली.

या अभिनेत्रीने दिला आवाज

अभिनेत्री दिया मिर्झा ही ईली हत्तीणीच्या या उपक्रमाची राजदूत आहे. तिनेच ईलीला आवाज दिला आहे. दिया मिर्झाच्या आवाजातच ही हत्तीण संवाद साधते.