मुंबई : दसऱ्याच्या दिवशी रेल्वेमार्गाने कर्जत, खोपोली गाठणे कठीण होणार आहे. गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ३.३० या कालावधीत ब्लाॅक घेण्यात येणार असल्याने कर्जत – खोपोलीदरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिनी प्रवाशांचे प्रचंड हाल होतील.
साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाच्या असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकजण वाहन, गृह किंवा नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात. कर्जत या भागात नवीन घरांची खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. परंतु, कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात कर्जत स्थानकावर प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात आला आहे.
हा ब्लाॅक भिवपुरी स्थानक – जांब्रुंग केबिन – ठाकूरवाडी – नागनाथ केबिन ते कर्जतदरम्यान असेल. या ब्लाॅकमुळे लोकल आणि लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
२ ऑक्टोबर रोजी रद्द होणाऱ्या लोकल
डाऊन लोकल रद्द
– दुपारी १.१५ वाजता सुटणारी कर्जत – खोपोली लोकल रद्द करण्यात येईल.
अप लोकल रद्द
– दुपारी २.५५ वाजता सुटणाऱ्या खोपोली – कर्जत लोकल रद्द करण्यात येईल.
लोकल अंशतः रद्द
– सकाळी ९.०१, ९.३०, ९.५७, ११.१४ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी – कर्जत लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येतील. नेरळ – कर्जतदरम्यानची लोकल सेवा रद्द असेल.
– दुपारी १२.०५ वाजता ठाणे – कर्जत लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येईल. नेरळ – कर्जतदरम्यानची लोकल सेवा रद्द असेल.
– दुपारी १२.२० वाजता सुटणारी सीएसएमटी – खोपोली लोकल नेरळ येथे रद्द करण्यात येईल. नेरळ – खोपोलीदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
– सकाळी १०.३६ वाजता आणि दुपारी २.४५ वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवण्यात येईल. अंबरनाथ – कर्जतदरम्यान लोकल सेवा रद्द असेल.
– दुपारी १.१९ वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल ठाणे येथे रद्द करण्यात येईल. ठाणे – कर्जतदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल.
– सकाळी १०.४३, ११.१९, दुपारी १२, १ आणि दुपारी १.५५ वाजता सुटणाऱ्या कर्जत – सीएसएमटी लोकल नेरळ येथून नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येतील.
– दुपारी १.२७ वाजता सुटणारी कर्जत – ठाणे लोकल नेरळ येथून नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येईल.
– दुपारी १२.२३ आणि दुपारी ४ वाजता सुटणाऱ्या कर्जत- सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येतील.
– दुपारी १.४८ वाजता सुटणारी खोपोली- सीएसएमटी लोकल ठाणे येथून नियोजित वेळापत्रकानुसार चालवण्यात येतील.